अकोला : वाशीम जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांत पावसाने झोडपून काढले आहे. रिसोड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला. रिसोड तालुक्यातील एक शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेले. शोध मोहिमेनंतर आज त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. रिसोड तालुक्यात गेल्या २४ तासांत ६२.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. वाशीममध्ये ३८, तर मालेगाव तालुक्यात २७.९ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी २७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. दरम्यान, पिराजी किसन गवळी (वय ६९, रा. मौजे वाडी रायताळ, ता. रिसोड, जि. वाशीम) हे नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी १५ ऑगस्टला गेले होते. स्थानिक नदीला अचानक आलेल्या पुराच्या जोरदार प्रवाहाबरोबर ते वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने शोधकार्य सुरू केले होते. पावसाचा जोर आणि पाण्याचा वेग यामुळे शोध कार्यात मोठे अडथळे येत होते. आज त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
जिल्ह्यातील कोंडाला झामरे येथे धरणाच्या सांडव्यामुळे सुमारे २० जणांवरे वाहून गेली. पाचंबा ते एकलासपूर रस्तावरील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली. अडाण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने धरणाचे दोन द्वार १० से.मी.ने शनिवारी दुपारी ४ वाजतापासून उघडली असून विसर्ग नदीत सोडण्यात आला. अडाण नदीकाठावरील गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील मानोली या गावाचा संपर्क तुटला आहे. मडाण नदीला पूर असून गावाच्या समोरून मंगरूळपीरकडे जाणाऱ्या रस्त्यारील नाल्याला पूर आला. तालुक्यातील मौजे कोठारी येथील अनिस खान अहमद खान यांची दोन बकरीची पिल्ले वाहून गेली असून एक बोकड मृतावस्थेत आढळले. वाशीम तालुक्यातील शेलूबाजार मार्गावर आसोला येथील पुलावर पुराचे पाणी वाहत असल्याने मार्ग बंद झाला. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली. पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वाशीम जिल्ह्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.