नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वेसाठी मुंबईहून डबे मागवण्यात आले आहे. हे डबे यापूर्वी इतर ठिकाणी वापरण्यात आल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी यांनी दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे रविवारी अजनी(नागपूर) -पुणे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. तसेच याच कार्यक्रमात बंगळुरू-बेळगाव आणि कटरा-अमृतसर वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्यांचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.
नागपूर(अजनी)-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसमुळे नागपूर ते पुणे हे अंतर जवळपास १२ तासात कापणे शक्य होणार असून यामुळे यापूर्वी लागणारा प्रवासाचा अधिकचा वेळ वाचणार आहे. देशातील रेल्वे मार्गांचा विकास म्हणजे विकसित भारताला आधुनिक आणि गतिमान प्रवास सुविधांची भेट असून या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवास आता सुलभ आणि गतिमान होणार आहे.
या सुविधेमुळे स्थानिकांना व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या गाडीसाठी वापरण्यात आलेले डबे मुंबईहून मागवण्यात आले. हे डबे यापूर्वी इतर मार्गावरील गाडीसाठी वापरण्यात आले आहेत. काही ठिकाणी प्रारंभी २० डब्यांची वंदे भारत चालवण्यात आली. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ती गाडी नंतर ८ डब्यांची करण्यात आली. त्यातील उरलेले डबे इतर मार्गावर वापरण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून मुंबईहून आलेले वापरातील डबे अजनी-पुणेला जोडण्यात आले आहे अशी माहिती आहे.
चेअर कारचे भाडे २१४० रुपये
अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसच्या एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे प्रवास भाडे ३८१५ रुपये आहे. तर चेअर कारचे भाडे २१४० रुपये आहे. यामध्ये भोजन सुविधा उपलब्ध आहे. भोजन सुविधा नको असल्यास प्रवास भाड्यातून ५४५ रुपये कमी होते.
८ डबे, १२ तासांचा प्रवास
पुण्याहून सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटेल, अजनीला सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहचेल. अजनीहून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटेल, पुण्याला रात्री ९ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला आठ डबे आहेत. त्यामध्ये एक एक्झिक्युटिव्ह चेअर कार, सात चेअर कार अशी एकूण ५९० प्रवासी क्षमता आहे.