नागपूर : एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या स्थापनेचा शताब्दी महोत्सव साजरा करत असताना युवक काँग्रेसने संघाला संविधानाची प्रत भेट देण्याचा प्रयत्न केला. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रेशीमबागेतील संघाच्या कार्यालयात जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना सक्करदरा चौकातून ताब्यात घेतले.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रमातील बापू कुटी येथे एक ऐतिहासिक घडामोड घडली. युवक काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाचा सन्मान करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय संविधानाची प्रत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भान चिब, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानपूर्वक सुपूर्द केली. ही संविधान प्रत संघाच्या रेशीमबाग येथील कार्यालयाला सुपूर्द करण्यासाठी युवक काँग्रेसने शांततामय व अहिंसक आंदोलनाचा निर्धार केला होता. यामागचा उद्देश एकच ‘देश हा मनुस्मृतीनुसार नव्हे, तर संविधानानुसार चालतो’ हे ठामपणे सांगणे.
संघ कार्यालयाला संविधानाची प्रत देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला असता, पोलिसांनी त्यांना अडवले आणि आंदोलनाला आळा घातला. कार्यकर्त्यांनी शांततेत संविधानाची प्रत देण्याचा मानस व्यक्त केला होता, मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अजनी पोलीस ठाण्यात नेले. या कारवाईमुळे संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. घटनात्मक अधिकारांचा अवमान होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पोलिसांच्या या कठोर भूमिकेचा अनेकांनी निषेध केला असून, लोकशाहीत असा प्रकार योग्य नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
युवक काँग्रेसच्या मते, संघाच्या १०० वर्षांच्या इतिहासात संविधानाचा आदर करण्याऐवजी मनुस्मृती व ‘बंच ऑफ थॉट्स’ सारख्या विचारांचा पुरस्कार करण्यात आला आहे, जे भारतीय लोकशाही व समतेच्या मूल्यांविरोधात आहेत. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने संविधान सत्याग्रह सुरू केला असून, संघाने आता तरी संविधान मान्य करावे, असा स्पष्ट संदेश या आंदोलनातून देण्यात आला. या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये कपिल ढोके, अनुराग भोयर, आकाश गुजर, अक्षय हेटे, रौनक चौधरी, मिथिलेश कन्हेरे, सुशांत लोखंडे, रजा अली, समीर तिमांडे यांच्यासह नागपूर जिल्हा व शहर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताची लोकशाही गांधी-आंबेडकरांच्या विचारांवर उभी आहे. जातीयता व विषमता पसरवणाऱ्या मनुवादी विचारांचा या देशात काही उपयोग नाही. संविधानाचा अपमान करणाऱ्यांविरोधात आमचा लढा अधिक तीव्र होईल, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले.