मालेगाव: धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा सलग तीन निवडणुकांमध्ये झालेला पराभव तसेच या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकीत धुळ्याची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढविण्यात यावी म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने केलेल्या सर्वेक्षणातही राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारास यशाची खात्री असल्याचे आढळून आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी येथे दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन २४ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अहमदनगर येथे पक्षाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची तयारी तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर ॲड. पगार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या धुळ्याच्या जागेसंदर्भात सुरु असलेल्या जागा अदलाबदली संदर्भात त्यांनी भाष्य केले. या लोकसभा मतदार संघातील सहापैकी मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण, धुळे शहर व शिंदखेडा या पाच विधानसभा मतदार संघांमध्ये काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे कुणाल पाटील हे आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा लढविल्यास विजय निश्चित असेल, असा दावा पगार यांनी केला. राज्यातील महायुती सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी याप्रसंगी टीका केली.

हेही वाचा… विधानसभा निवडणुकीपूर्वी मालेगाव जिल्हा निर्मिती होणार; पालकमंत्री दादा भुसे यांची ग्वाही

सत्ताधारी पक्षाचे लोक सध्याचे सरकार गतिमान व लोकांचे सरकार असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र परिस्थिती नेमकी उलटी आहे, असे पगार म्हणाले. आज शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. दुसरीकडे महागाई प्रचंड वाढली आहे. इंधनाचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी पक्षातर्फे वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहेत. कांदा प्रश्नी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात लवकरच मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही पगार यांनी सांगितले.

हेही वाचा… नाशिक: लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप पवार,बाजार समितीचे उपसभापती विनोद चव्हाण, यशवंत शिरसाट,विजय दशपुते, राजेंद्र पवार,भगवान देवरे, सुजित सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adv ravindra pagar claims that according to the survey ncp is sure of success in dhule lok sabha constituency dvr