नाशिक – सप्टेंबरमध्ये राज्यातील विविध जि्ल्ह्यांत अतिवृष्टी व पूरामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी साडेतेहतीस लाखहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३२५८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात नाशिक विभागातील सुमारे १५ लाख ८० हजार नुकसानग्रस्तांना साडेअकरा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीपोटी १४७४ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे
राज्य शासनाने दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचे आश्वासित केले होते. धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळीच हे आदेश निर्गमित करण्यात आले. सप्टेंबरमधील शेती पिकांच्या नुकसानीचे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने युद्ध पातळीवर पंचनामे केले . अंतिम पंचनामे झाल्यानंतर विभागीय आयुक्तांमार्फत निकषानुसार निधी मागणीचे प्रस्ताव सादर झाले होते. राज्यात २७ लाख ५९ हजार क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. निश्चित केलेल्या दरानुसार राज्यातील ३३.६५ लाख शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ३२५८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. चालू हंगामात यापूर्वी शेती पिकांच्या नुकसानीसाठी वितरित केलेल्या मदतीचा या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही, याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांनी काळजी घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
सरकारच्या निर्णयानुसार नाशिक विभागातील सुमारे १५ लाख ७९ हजार २३९ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील (४०९४७४), धुळे (१६३५७), नंदुरबार (९३१), जळगाव (३२५३५९) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील (८२७११८) बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. विभागात तब्बल ११ लाख ५० हजार ३०१ क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यात अहिल्यानगरला सर्वाधिक फटका बसला. या जिल्ह्यात सहा लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी ८४६ कोटी, नाशिकमध्ये २.८८ लाख हेक्टर (३१७ कोटी), जळगाव जिल्ह्यात २.४७ लाख हेक्टर (२९९ कोटी), धुळे जिल्ह्यात ११ हजार ५९४ हेक्टर (१० कोटी) आणि नंदुरबार जिल्ह्यात ४४५ हेक्टर (५३ लाख) अशी एकूण १४७४ कोटींची मदत वितरित केली जाणार आहे.
बाधित शेतकऱ्यांची यादी प्रशासकीय यंत्रणेकडे तयार आहे. ही यादी बँकांकडे सोपविण्याचे काम प्रगतीपथावर असून एक-दोन दिवसांत सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रविवारनंतर दिवाळीत सोमवार वगळता पुढील दोन दिवस म्हणजे २१ व २२ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडव्याची बँकांना सुट्टी असेल, त्यामुळे तत्पूर्वी ही रक्कम खात्यात येईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.