जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतीप्रश्नी बुधवारी पक्षविरहित जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी निवेदन बाहेर स्वीकारण्यासाठी न आल्याने शेतकऱ्यांनी बळजबरीने प्रवेशद्वार उघडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर प्रशासनाने शेतीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या २८ तारखेला दुसरा मोर्चा थेट जळगावमधील पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्यात येईल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याच धर्तीवर जळगावमध्येही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या माध्यमातून काळ्या फिती लावून तसेच काळे कपडे घालून सरकारचा निषेध करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करून केळी, कापूस, कांदा, मका, ज्वारी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. दोघांनी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सुद्धा सडकून टीका केली.
यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. तुमच्या जिल्ह्यातील संकटमोचक फक्त पक्षासाठी आहेत, ते जनतेसाठी नाहीत. हे सगळे सरकारचे गुलाम आहेत. एकेकाळी जोरात आवाज करणाऱ्यांच्या खालूनही आता आवाज निघत नाही, असा टोला त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांना हाणला. दरम्यान, जिल्हाधिकारी किंवा दुसरे कोणी अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने माजी खासदार पाटील आणि बच्चू कडू हे शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले.
परंतु, पोलिसांनी आधीच मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस बळाला न जुमानता बळजबरीने मुख्य प्रवेशद्वार उघडले. आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या लोखंडी चॅनेल गेटवर उभ्या असलेल्या पोलिसांचा विरोध मोडीत काढून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळवला. आंदोलकांच्या भावना समजून घेत अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली.
शेतकरी आक्रोश मोर्चानंतर बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील चारही मंत्र्यांवर त्यांनी शेतीप्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल टिकास्त्र सोडले. शेतकरी त्यांचे गाऱ्हाणे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडू शकणार नाही, अशी व्यवस्था आधीच करण्यात आली होती. मात्र, ती व्यवस्था शेतकऱ्यांनी एकजुटीने हाणून पाडली. आता दुसरा मोर्चा थेट पालकमंत्र्यांच्या घरावर काढायचा आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी तयार राहावे, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. कर्जमुक्तीचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या ताकदीने येत्या २८ तारखेला आंदोलन करेल. नागपूर सुद्धा शेतकऱ्यांनी खच्चून भरणार आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी आणि मक्याची खरेदी केंद्रे कधी सुरू करणार आहेत, हे सरकारने येत्या १०-१२ दिवसांत न सांगितल्यास २८ तारखेची वाट पाहिली जाणार नाही. आधी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यानंतर थेट पालकमंत्र्यांच्या घरात शेतकरी घुसतील, असे बच्चू कडू यांनी सांगितले.