नाशिक : मुसळधार पावसामुळे यंदा जिल्ह्यातील लहान-मोठी धरणे तुडुंब भरलेली आहेत. जलाशय, सिंचन तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, कोपरगाव पद्धतीचे बंधारे यांची वेगळी स्थिती नाही. गणेश विसर्जन करताना धरण, जलाशय परिसरात अनेकदा दुर्घटना घडलेल्या आहेत. यावेळी सर्वच धरणे, तलाव तुडुंब भरलेले असल्याने दुर्घटना व जल प्रदूषण टाळण्यासाठी गणेश भक्तांनी अशा ठिकाणी गणेश विसर्जन करू नये, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाने केले आहे.

शहर व ग्रामीण भागात सध्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. लाडक्या गणरायाला शनिवारी, अनंत चर्तुदशीच्या दिवशी निरोप दिला जाणार आहे. विर्सजनावेळी गणेशभक्तांना अधिक दक्षता घ्यावी लागेल. कारण, पावसामुळे पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील सर्वच २६ धरणे काठोकाठ भरलेली आहेत. बुधवारी या धरणांमध्ये ६७ हजार ७५२ दशलक्ष घनफूट म्हणजे ९६ टक्के जलसाठा होता. मोठ्या व मध्यम धरणांप्रमाणे ग्रामीण भागातील लहान-मोठे तलाव, पाझर तलाव, बंधारे भरलेले आहेत. नद्या-नाल्यांमधून पूर पाणी वहात आहे. मागील काही वर्षात गणेश विसर्जनावेळी अशा ठिकाणी पाण्याच्या खोलीचा अंदाज न येणे, गाळात पाय रुतणे वा पाय घसरून पाण्यात पडल्याने दुर्घटना घडलेल्या आहेत.

जल संधारण योजनांतील पाणी हे प्रामख्याने गावे, शहरांसाठी तसेच धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांसाठी पिण्यासह शेती सिंचनासाठी वापरले जाते. गणेशोत्सवाची सांगता करताना जीवितहानीच्या घटना व जल प्रदूषण टाळण्यासाठी जलाशय, सिंचन तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, कोपरगाव पद्धतीचे बंधारे यामध्ये गणेशमूर्ती व निमार्ल्य विर्सजित करू नये, असे मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी ह. का. गिते यांनी म्हटले आहे.

जलाशंयातील प्रदूषण टाळण्यासाठी, पर्यावरण सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन कालावधीत आपल्या विभागांच्या कार्यक्षेत्रातील जलाशयात व धरणांमध्ये गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी मृद जलसंधारण विभागाने सूचित केले आहे. जेणेकरून धरण परिसर प्रदुषणमुक्त व नागरिकांच्या सुरक्षा योग्य राहील.

यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी धरण परिसरातील शहरे व गावातील नागरिकांना स्थानिक पातळीवर व ग्रामपंचायत स्तरावर गणेश मूर्ती विसर्जनासाठी तात्पुरत्या स्वरूपात कृत्रिम कुंड तयार करावेत व निर्माल्य कलश स्वतंत्रपणे ठेवावा, असेही जलसंधारण अधिकरी गिते यांनी म्हटले आहे. शहर व ग्रामीण भागातील अनेक गणेश भक्त आसपासच्या धरण, बंधाऱ्यात वा नदी पात्रात मूर्ती विसर्जनासाठी जातात. गोदावरीसह अनेक नद्या सध्या दुथडी भरून वहात आहे. त्यामुळे विसर्जनावेळी खबरदारी घ्यावी, असे आवाहन यंत्रणांकडून केले जात आहे.