जळगाव – जिल्ह्यात रक्षाबंधनापूर्वी दोन हजार रूपयांवर असलेले केळीचे दर व्यापाऱ्यांच्या एकजुटीमुळे आता निच्चांकी पातळीवर आहेत. मोठ्या प्रमाणात खर्च करून उत्पादित केलेली केळी मातीमोल भावात विकण्याची वेळ आल्याने संबंधित सर्व शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुर्दैवाने प्रशासनाचे कोणतेच नियंत्रण न राहिल्याने व्यापारी शेतकऱ्यांची सर्रास लूट करताना दिसत आहेत.
जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन होते. या भागातील कृषी उत्पन्न बाजार समित्या दररोज दर जाहीर करतात. मात्र, प्रत्यक्षात व्यापारी वर्ग मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीने जाहीर केलेल्या फलकावरील भाव प्रमाण मानतात. त्यामुळे बऱ्हाणपूरच्या केळी भावात थोडासा चढ-उतार झाला तरी त्याचे पडसाद केवळ खान्देशात, महाराष्ट्रातच नाही तर देशभर उमटतात. याच परिस्थितीचा फायदा घेत बऱ्हाणपूर बाजार समितीत कार्यरत यंत्रणा मनमानी पद्धतीने दर ठरवत असल्याचे चित्र काही दिवसांपासून दिसत आहे. केळीचे दर कधीही मनमानी वाढवले जातात, तर कधी त्यात अचानक घसघशीत घसरण केली जाते. या कृत्रिम चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही. मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागते.
बऱ्हाणपूर बाजार समितीत १२ ऑगस्टपर्यंत केळीला कमाल १८२५ रूपये प्रति क्विंटलपर्यंत भाव होता. मात्र, त्यानंतर व्यापाऱ्यांनी एकजूट करून केळीचे भाव पाडण्यास सुरूवात केली. कधी १५००, कधी १३०० तर कधी १२००, अशा पद्धतीने मनमानी केव्हाही केळीचे भाव कमी-जास्त करण्याची खेळी व्यापाऱ्यांनी खेळली. अशा स्थितीत बाजार समितीने जाहीर केलेल्या बोर्ड भावाप्रमाणे तरी केळी खरेदी झाली पाहिजे, अशी आशा शेतकरी बाळगून होते.
परंतु, शेतकऱ्याच्या शेतातून केळी काढणी करताना व्यापाऱ्यांनी आणखी निम्याने भाव कमी केले. या सर्व गोंधळात केळी उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५०० ते ६०० रूपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. याशिवाय, भाव कमी करूनही व्यापारी मुद्दाम केळी काढणीसाठी आढेवेढे घेत असल्याचे प्रकार आता घडताना दिसत आहेत. केळी दरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी जळगाव आणि बऱ्हाणपूर जिल्हा प्रशासनाची बैठक होणार होती. मात्र, काही कारणास्तव ती बैठक रद्द झाली. तेव्हापासून खऱ्या अर्थाने केळी व्यापारी शेतकऱ्यांना लुटताना दिसत आहेत.
किरकोळ बाजारात केळीला भाव
व्यापाऱ्यांकडून संगनमताने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या केळीचे भाव पाडले जात असले, तरी किरकोळ बाजारात चांगली मागणी असल्याने पिकलेल्या केळीला ३० ते ४० रूपये प्रति डझनचा भाव मिळत आहे. हा सर्व प्रकार पाहुन शेतकरी अचंबित झाले आहेत. शेतकऱ्यांची लुबाडणूक करून नफा कमावणाऱ्या व्यापाऱ्यांवर शासनाचे नियंत्रण आणण्याची मागणी त्यामुळे केली जात आहे.
व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना भाव दिला किंवा नाही दिला तरी किरकोळ बाजारात कधीच पिकलेल्या केळीचे भाव कमी-जास्त होताना दिसत नाही. आताही कच्च्या केळीचे भाव निच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत, तरी पिकलेली केळी ३० रूपये डझनच्या पुढेच विकली जात आहे. – डॉ. रवींद्र निकम (केळी उत्पादक, माचला, जि. जळगाव).
बऱ्हाणपुरात सध्या कमाल १२०० रूपये प्रति क्विंटलचा भाव असला, तरी प्रत्यक्षात व्यापारी चांगल्या केळीला वापसीचा भाव देत आहेत. मला स्वतःला ६५० रूपये प्रति क्विंटलप्रमाणे केळी द्यावी लागली आहे. व्यापारी केळीला मागणी नसल्याचे सांगतात, मग किरकोळ बाजारात कसा काय पिकलेल्या केळीला भाव आहे. – अतुल पाटील (केळी उत्पादक, केऱ्हाळे, जि. जळगाव).