जळगाव : शहरातील मेहरूण तलावाच्या सुशोभिकरणासाठी १५ कोटींचा निधी मंजूर असला, तरी दूषित पाण्यामुळे तो निधी वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे. तसेच कमाई गोड लागत असल्याने संबंधितांवर कोणतीच कारवाई बहुधा आयुक्तांकडून केली जात नसावी, असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.

जळगावमधील प्रसिद्ध मेहरूण तलावात जल पर्यटन प्रकल्प राबविण्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या वर्षी केली होती. त्यानुसार प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून मेहरूण तलावाचा परिसर विकसित करण्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्या संदर्भात कार्यारंभ आदेश मे महिन्यात देण्यात आले असून, ७५ लाखांचा निधी पहिल्या टप्पात वितरीत करण्यात आला आहे. मात्र, तलावातील पाण्याने गाठलेली दूषित पाण्याची पातळी लक्षात घेता कोट्यवधींचा निधी खर्च केल्यानंतरही पर्यटक तिकडे किती फिरकतील, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

परिसरात असलेले बंगले, इमारती तसेच नागरी वस्त्यांमधील सांडपाणी थेट मेहरूण तलावात सोडले जाते. ज्यामुळे तलावातील पाण्याचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. २०१७ मध्ये एका प्रयोगशाळेतील तपासणीतून या तलावाचे पाणी जीवजंतू आणि वनस्पतींसाठी घातक असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. याशिवाय, काही महिन्यांपूर्वी तलावातील हजारो मासे दूषित पाण्यामुळे मरण पावले होते.

परिसरातील सांडपाण्याच्या अयोग्य निचऱ्यामुळे मेहरूण तलावाच्या जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. तलावातील पाणी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. आवश्यकतेपेक्षा तब्बल पाचपट जास्त गढूळपणा, वाढती क्षारता आणि ऑक्सिजनचे कमी प्रमाण, यामुळे तलावातील पाणी वनस्पतींच्या वाढीसह जीवजंतूंसाठीही अत्यंत घातक ठरले आहे. परिणामी तलावातील अन्नसाखळी विस्कळीत होऊन जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रयोगशाळेच्या तपासणीत हे पाणी नाल्यातील पाण्यासारखेच रंग, दुर्गंधी आणि घातक रसायनांनी युक्त असल्याचे स्पष्ट झाले होते. ते मानवी आरोग्यासाठीही धोक्याचे ठरू शकते. असे असताना, महापालिका प्रशासन मेहरूण तलावात परिसरातील उच्चभ्रूंच्या बंगल्यासह उंच इमारती आणि नागरी वस्त्यांचे पाणी थेट तलावात सोडण्यापासून रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मेहरूण तलावातील दूषित पाण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला असताना, आमदार भोळे यांनी महापालिका प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली. तलावात सांडपाणी सोडणाऱ्या बंगल्यांना किंवा मोठ्या इमारतींना बांधकाम परवानगी देऊ नये, या संदर्भात आयुक्तांना दोन ते तीन वेळा पत्रे दिली आहेत. संबंधितांना परवानगी द्यायचीच असेल तर त्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

सेंट टेरेसा शाळेला त्याच अटीवर मेहरूण तलावाच्या परिसरात परवानगी देण्यात आली आहे. मात्र, महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी नियमांचे उल्लंघन करून बंगल्यांसह इमारतींना सर्रास बांधकाम परवानगी देत असतात. आणि त्यांच्यामुळेच मेहरूण तलावाचे पाणी आज सर्वाधिक दूषित झाल्याचा आरोप आमदार भोळे यांनी केला. आम्हाला कारवाईचे अधिकार नाही, अन्यथा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली असती. ते अधिकार आयुक्तांना असले, तरी कमावणारा मुलगा कोणालाही गोड वाटतो. तशीच परिस्थिती सध्या महापालिकेत असल्याकडे आमदार भोळे यांनी लक्ष वेधले.