मनमाड : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. त्यामुळे मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून देशातील विविध भागात जाणार्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. अनेक जाणार्या व येणार्या गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. काही गाड्यांचा प्रवास अर्ध्यावरच खंडीत करण्यात आला.

मंगळवारी दुपार नंतर मुंबईकडून येणार्या गाड्या कमालीच्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. परिणामी नाशिक, मुंबई येथे नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास करणार्या व्यापारी, उद्योजक, चाकरमान्यांचे हाल झाले. दुपारपासून भुसावळसह विविध राज्यात जाण्यासाठी मनमाड रेल्वे स्थानकात प्रवासी मोठ्या प्रमाणात खोळंबून होते. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे काही प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले. मंगळवारी मुंबई येथून सुटणारी मुंबई-मनमाड-धुळे एक्स्प्रेस आणि २० तारखेला सुटणारी धुळे-मनमाड मुंबई एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. तसेच मंगळवारी मुंबईतून सुटणारी मुंबई-जालना, आणि बुधवारी जालना येथून जालना – मुंबई वंदे भारत या गाड्या रद्द करण्यात आल्या.

मंगळवारी अमरावती – मुंबई एक्स्प्रेस ही गाडी नाशिकरोड पर्यंतच धावणार आहे. या गाडीचा नाशिक ते मुंबई प्रवास रद्द करण्यात आला तर बुधवारी मुंबई- अमरावती ही गाडी मुंबई ऐवजी नाशिकरोड येथून आपल्या नियोजित वेळेत सुटणार आहे. काही प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मनमाडसह विविध रेल्वे स्थानकावर मदत केंद्रे स्थापन करण्यात आले आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकाबाबत या केंद्रातून त्वरित माहिती व प्रवाशांना अत्यावश्यक मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

तपोवन एक्स्प्रेस खोळंबली

नांदेड येथे अतिवृष्टी आणि मुंबई येथे सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस मंगळवारी सायंकाळी मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात तब्बल तासभर खोळंबून होती. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या गाडीचा मुंबईपर्यंतचा प्रवास होतो की नाही, अशी शंका असल्याने प्रवासी द्विधा मनस्थितीत दिसून आले. मनमाड रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनवर प्रवाशांच्या सुविधेसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.