लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : शहरातील द्वारका चौफुली परिसर नेहमी वाहतूक कोंडीमुळे चर्चेत असतो. चौकात कायम होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका चौकात उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

याबाबत भुजबळ यांनी नाशिकचे महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंके यांना लेखी पत्र दिले आहे. शहरातील द्वारका चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या ठिकाणी मुंबई-आग्रा आणि नाशिक-पुणे हे दोन महामार्ग एकमेकांना छेदतात. त्यामुळे चौकात येणाऱ्या वाहनांचे प्रमाणही अधिक आहे.

आणखी वाचा-नाशिक : मुंढेगावातील विहिरीत मायलेकीचे मृतदेह

चौक परिसरात नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय, वाहतूदारांची कार्यालये, वेगवेगळी व्यापारी संकुले आहेत. चौफुलीपासून काही अंतरावर नाशिकरोड रेल्वेस्थानक आहे. द्वारका चौफुलीचे व्यापारी दृष्टीने असणारे महत्व, याठिकाणी असलेली कार्यालये, यामुळे सातत्याने वाहतुकीची वर्दळ असते. चौफुलीकडे शहरातून नाशिकरोड, शालिमार, कन्नमवार पूल तसेच मुंबई नाका या बाजूकडून वाहतूक येत असते. यामुळे या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होते.

या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी हाजी अलीच्या धर्तीवर व्यवस्था करण्याची गरज आहे. चौकातील घेर काढून टाकण्याची नितांत आवश्यकता आहे. मुंबई शहरातील हाजी अली येथे घेर असतांना अशीच वाहतूक कोंडी होत होती. त्या ठिकाणचा घेर काढून सरळ वाहतूक केल्यापासून वाहतूक सुरळीत झाली आहे. त्याच धर्तीवर नाशिक शहरातील द्वारका चौकात वाहतूक सरळ करण्यात यावी, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी केल्या आहेत.