नाशिक : देशाच्या न्याय व्यवस्थेत तब्बल १४० न्यायाधीश आणि सुमारे १० हजार विधिज्ज्ञ देणाऱ्या येथील गोखले शिक्षण सोसायटीच्या न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयात शनिवारी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे भेट देणार आहेत. भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त महाविद्यालयात संविधानातील उद्देशिका फलकाचे अनावरण न्या. गवई यांच्या हस्ते होणार आहे.

जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारताचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा शनिवारी न्या. भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. नाशिक दौऱ्यावर असणारे न्या. गवई हे जिल्हा न्यायालयाच्या उद्घाटनानंतर न. ब. ठाकूर महाविद्यालयात दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखऱ्, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, नाशिकचे पालक न्यायाधीश सारंग कोतवाल आणि अश्विन भोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे यांच्या अध्यक्षतखाली हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार करण्यात येणार आहे. न्या. गवई यांच्या हस्ते संविधानातील उद्देशिका फलकाचे अनावरण, विधी संशोधन केंद्र, नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन आणि विधी विशेष मासिकाचे प्रकाशन होणार आहे. याबाबतची माहिती प्राचार्य डॉ. एच. आर. कादरी, उपप्राचार्य डॉ. एस. के. मांडवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१९६९ साली स्थापन झालेले न. ब. ठाकूर हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले विधी महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयातून आजवर तब्बल १० हजार विद्यार्थ्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. १४० विद्यार्थी न्यायाधीश म्हणून कार्यरत झाले. चार विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले., याकडे प्रा. कादरी यांनी लक्ष वेधले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक हे याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. नाशिक वकील संघटनेत येथून शिक्षण घेणाऱ्या ९० टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ठाकूर महाविद्यालयाचे विद्यार्थी आज मुंबई उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आदी ठिकाणी वकिली व्यवसाय करीत आहेत. विधी महाविद्यालयात पाच वर्षांचे शिक्षण घे्ऊन विद्यार्थ्यांना तीन वर्ष सराव (प्रॅक्टीस) करावा लागतो. मग जेएमएफसी परीक्षा देता येते. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन दरवर्षी सात ते आठ विद्यार्थी जिल्हास्तरीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होतात, असे प्रा. मेधा सायखेडकर यांनी नमूद केले.