धुळे : गढीवर जाऊन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे चहाचा घोट घेवून आलेले काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये दाखल होत नाहीत तोच, काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनीही गढीवरील उफाळलेल्या चहाचा स्वाद घेतल्याने जिल्ह्यातील काँग्रेसजन मात्र अस्वस्थ झाले आहेत. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत घेतलेल्या चहाचा आणखी एक चटका काँग्रेसला बसेल की काय, अशी धास्ती कार्यकर्त्यांना वाटत आहे.
खासदार बच्छाव यांच्याकडून पालकमंत्री रावल यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचे कारण सांगितले जात असले तरी कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेशही अशाच मार्गांनी झाला असल्याने खासदारांना आता हा चहा पचविणे जड झाले आहे. स्वातंत्र्यापासून धुळे जिल्ह्यावर राहिलेल्या काँग्रेसच्या एकछत्री वर्चस्वास मागील दोन-तीन निवडणुकांपासून हादरे बसण्यास सुरुवात झाली. धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. त्यानंतरही काँग्रेस दोन्ही जिल्ह्यात तग धरून राहिली.
केंद्रात भाजप सत्तेवर आला असतानाही धुळे जिल्ह्यात मात्र निष्ठावान कार्यकर्ते,पदाधिकारी काँग्रेसमागे खंबीरपणे उभे राहिले. परंतु, भाजपच्या झंझावातात धुळे जिल्ह्यातील एकेक जागा जाऊ लागली. जिल्ह्यात काँग्रेसचे कुणाल पाटील हे एकमेव आमदार उरले होते. अशा बिकट परिस्थितही धुळे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने बाजी मारली. या निवडणुकीवेळीच कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील आणि भाजपची उमेदवारीही त्यांना मिळेल, अशी चर्चा रंगली होती. परंतु, तसे झाले नाही. नाशिक आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नाोवाईकांचे जाळे असलेल्या डॉ. शोभाताई बच्छाव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. आणि सर्वत्र भाजपचा बोलबाला सुरु असतांना काँग्रेसच्या डॉ. बच्छाव या निवडून आल्या. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र कुणाल पाटील यांचा पराभव झाला.