जळगाव : राष्ट्रवादीचे (शरद पवार) माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि डॉ. सतीश पाटील या दोघांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. दोन्ही दिग्गजांचे बळ मिळाल्याने बँकेच्या अध्यक्षांसह इतर संचालक निर्धास्त होते. परंतु, यावल तालुक्यातील मधुकर साखर कारखान्याच्या विक्रीवरून प्रश्न उपस्थित झाल्याने वादाची ठिणगी पडली.

जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेला अध्यक्ष संजय पवार यांच्यासह संचालक गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील, जनाबाई पाटील, शैलजा निकम, प्रदीप देशमुख, जयश्री महाजन, नाना पाटील, रवींद्र पाटील, प्रताप पाटील आणि कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. दरम्यान, एका सभासद शेतकऱ्याने फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना विकताना देवकर यांनी कमिशन खाल्ल्याचा आरोप मंत्री गुलाबराव पाटील करतात. त्याबद्दल खुलासा करण्याची मागणी केली. त्याविषयी स्पष्टीकरण देताना देवकर यांनी मधुकर कारखाना विक्रीची संपूर्ण प्रक्रिया सभागृहात सांगितली.

मधुकर कारखाना थकीत कर्जापोटी जिल्हा सहकारी बँकेच्या ताब्यात होता. आणि त्याची ६३ कोटी रुपयाला विक्री करण्यात आली आहे. या विक्री प्रक्रियेला जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे. कारखाना विक्रीसाठी ऑनलाइन निविदा मागविण्यात आल्या होत्या. सर्वाधिक बोली लावणाऱ्यालाच कारखाना विक्री झाला. तसेच सर्व व्यवहार अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्यात आला होता, असा दावा देवकर यांनी केला.

त्याच प्रमाणे जिल्हा सहकारी बँकेचे ६३ कोटी रूपये पाण्यात होते. मात्र, मधुकर साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेनंतर ६३ कोटी रूपयांचे कर्ज एकरकमी वसूल झाले. ज्यामुळे १५० ते २०० कोटी रूपयांच्या तोट्यात असलेल्या बँकेची नफ्याकडे वाटचाल सुरू झाली. इतर ठिकाणी साखर कारखाने बंद पडले आहेत आणि बँकांचे करोडो रूपये अडकले आहेत, असेही देवकर यांनी स्पष्ट केले. मधुकर साखर कारखान्याच्या विक्री व्यवहारात माझ्यासह इतर कोणी संचालकाने एक रूपया खाल्ल्याचा कोणी पुरावा द्यावा. आम्ही सर्व संचालक राजीनामा देऊ. आम्ही पैसे खाण्याचे उद्योग केलेले नाही. महाराष्ट्रात सर्वात जास्त रकमेची निविदा या कारखान्याची आली होती, असे देखील देवकर यांनी ठणकावून सांगितले.

या दरम्यान, संचालक मंडळाला जाब विचारणाऱ्या सभासद शेतकऱ्याने तुम्ही ६३ कोटीला कारखाना विकल्याचे सांगता. मात्र, त्याठिकाणी ३० कोटींची तर साखर होती, असे बोलून सर्व संचालकांना निरुत्तर केले. या शिवाय काही पतसंस्था आणि कारखान्यांकडे कोट्यवधींचे कर्ज थकीत असल्याचे सांगून त्यांच्यावर का कारवाई करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. ज्यांच्याकडे बँकेचे कर्ज थकीत आहे, त्यांची नावे जाहीर करण्याची मागणीही सदर सभासदाने केली. या वेळी रावेरसह बेलगंगा सहकारी साखर कारखाने आधीच विकले होते. त्यानंतर मधुकर साखर कारखाना जिल्हा बँकेने विक्रीस काढल्याचे देवकर यांनी नमूद केले.