धुळे : गेल्या दोन वर्षांपासून भ्रष्टाचार, गैरव्यवस्था आणि शहरातील नागरी समस्यांबाबत सतत टीकेचे धनी ठरलेल्या या आयुक्तांच्या बदलीचे स्वागत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करून केले. महानगरपालिका प्रवेशद्वारावर झालेल्या या आंदोलनात “टक्केवारी वाली बाई गेली” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील, प्रशांत भामरे, सुनील पाटील, डॉ. अनिल पाटील, अण्णा फुलपगारे, शिवाजी शिरसाळे, आनंद जावडेकर, महादू गवळी, डॉ. संजय पि़गळे, अजय चौधरी, निलेश कांजरेकर, विष्णू जावडेकर, नितीन देशमुख, अनिल शिरसाट, सागर निकम, इश्तियाक असारी, शुभम रणधीर, योगेश पाटील, सुरज भावसार, तेजस सपकाळ, सचिन शिंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासंदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, धुळे शहरात गेल्या दोन वर्षांत प्रचंड निधी खर्च करूनही विकासकामे ठप्प राहिल्याचा आरोप नागरिक आणि शिवसेनेने वारंवार केला होता. रस्त्यांवरील खड्डे, साचलेला कचरा, पावसात तयार होणाऱ्या नद्या, आणि अपुऱ्या स्वच्छतेमुळे शहरात निर्माण झालेल्या अस्वच्छ वातावरणामुळे नागरिक त्रस्त होते. अनेक कोटी रुपये खर्चूनही शहरातील पायाभूत सुविधा सुधारल्या नाहीत असाही आरोप पत्रकात करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांत सुमारे दोन हजार कोटींची कामे मंजूर झाली, पण प्रत्यक्षात त्याचे कोणतेही परिणाम शहरात दिसले नाहीत. दीपमाळ, एलईडी लाईट्स, गार्डन प्रकल्प, रस्ते यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले, मात्र कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट होता. स्वच्छतेच्या नावाखाली अनेकदा टेंडर काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला.
या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या बदलीनंतर शिवसेनेने तीव्र आनंद व्यक्त करत प्रशासनातील भ्रष्टाचाराविरुद्ध इशारा दिला.“यापुढे धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना धुळेकर माफ करणार नाहीत. शिवसेना प्रशासनातील बेईमानीविरुद्ध रस्त्यावर उतरेल,” असा इशारा महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी दिला.
शिवसेनेच्या या आंदोलनामुळे धुळे शहरात एकप्रकारे जनतेचा साचलेला संताप बाहेर आला. नागरिकांमध्येही बदलीनंतर दिलासा व्यक्त करण्यात आला असून, नव्या आयुक्तांकडून पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
