धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) धुळे महानगरपालिका निवडणूक २०२५ जिंकताना ‘महापौर राष्ट्रवादीचाच’ असा दावा करत ‘सुकाणू समिती’ची घोषणा केली.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी धुळे शहर महानगरपालिकेसाठी विशेष ‘सुकाणू समिती’ची घोषणा करून अध्यक्षपदाची जबाबदारी माजी आमदार फारुक अन्वर शहा यांच्याकडे सोपविली आहे. या समितीद्वारे पक्षाच्या निवडणूक तयारीला वेग मिळणार असून, उमेदवारांची निवड आणि प्रचार नियोजनाची जबाबदारी या समितीकडे राहणार आहे.
तटकरे यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, ही समिती पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, मान्यवर नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आगामी निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी करणार आहे तसेच, धुळे मनपेत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रभावी रणनीती आखणार आहे. गठीत करण्यात आलेल्या ‘सुकाणू समिती’मध्ये माजी आमदार फारुक अन्वर शहा यांच्या सोबत जेष्ठ आणि अनुभवी असे धुळे ग्रामीण विधानसभेचे माजी आमदार प्रा. शरद पाटी, ज्येष्ठ नेते शामभाऊ सनेर, सुनील नेरकर आणि जोसेफ मलबारी, महापालिकेचे माजी सभागृह नेते कांतीलाल दालवाले, माजी नगरसेवक गणेश जाधव,ज्येष्ठ महिला प्रतिनिधी डॉ. दीपश्री नाईक आणि माजी नगरसेवक अनिल मुंदडा यांचा समावेश आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी पाठवलेल्या पत्राद्वारे धुळे शहरातील संघटनात्मक हालचालींना अधिक गती देण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. या समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळे महानगरपालिका निवडणुकीत विरोधकांच्या तुलनेत सर्वात आधी अधिक संघटित, नियोजनबद्ध आणि प्रभावीपणे उतरल्याचे स्पष्ट होत आहे.
येथील महापालिका निवडणुकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचा दावा माजी आमदार फारुक शाह यांनी केला आहे. यामुळे होऊ घातलेली ही निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची मानली जात असून, शहरातील संघटनात्मक पातळीवर नवचैतन्य निर्माण झाल्याचाही दावा शहा यांच्याकडून केला जातो आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार,शहर विकासाचे ठोस व्हिजन आणि नागरिकांच्या अपेक्षांना केंद्रस्थानी ठेवून प्रचार मोहीम राबविण्याची तयारी या सुकानु समितीतर्फे सुरू करण्यात येणार असून महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणले जातील आणि महापौर पदही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच हाती असेल असा ठाम आत्मविश्वास फारुख शहा यांनी व्यक्त केला आहे.
आधी एमआयएम पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर दुसऱ्यांदा झालेल्या निवडणुकीत फारुक शहा यांचा भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांच्याकडून पराभव झाला.यानंतर फारुक शाह यांनी “एमआयएम’’ला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.यामुळे शहा यांनी आगामी निवडणुकी संदर्भात केलेल्या या विधानानंतर शहराच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आणि इतर पक्षांनाही आता लवकरच आपल्या रणनीती आखण्याची सुरुवात करणे भाग पडले आहे.
एकूणच, माजी आमदार फारुख शहा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) धुळे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. पक्षाने केलेल्या ‘महापौर राष्ट्रवादीचाच’ या दाव्यामुळे २०२५ ची मनपा निवडणूक अत्यंत चुरशीची आणि राजकीयदृष्ट्या रंगतदार होणार आहे.
