धुळे – शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय गुन्हेगारी नियंत्रणात आणणे अशक्य असल्याने या प्रयत्नांमध्ये नागरिकांनाही सामील करुन घेण्याचा प्रयत्न धुळे जिल्हा पोलिसांनी केला आहे. त्याचे फलितही दिसू लागले आहे.
पोलिसांकडे जाण्यास सहसा नागरिक तयार होत नाहीत. पोलिसांविषयी असलेली एक भीती किंवा तक्रार देण्यासाठी आपण गेल्यावर आपलीच उलटतपासणी होईल की काय, असे त्यांना वाटत असते. त्यामुळे एखादी गुन्हेगारी घटना डोळ्यांसमोर घडत असतानाही अनेक जण त्याविषयी पोलिसांना कळविण्याचे टाळतात. अनेक जण तर स्वत:वर अन्याय होत असला तरी पोलिसांकडे जात नाहीत. हे सर्व बदलण्यासाठी आणि नागरिकांना पोलिसांशी थेट संपर्क करता यावा, यासाठी एक जानेवारीपासून जिल्हा पोलीस विभागाने डायल ११२ ही विशेष संपर्क कार्यप्रणाली उपलब्ध करून दिली.
पोलिसांचा हा उपक्रम नागरिकांच्या पसंतीस आला असून आतापर्यंत डायल ११२ या कार्यप्रणालीवर १२ हजार ४३९ जणांनी संपर्क साधल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. गुन्ह्यांविषयी २९ टक्के तर महिलांसंबंधीत विषयावर २२ टक्के संपर्क झाले आहेत. रस्ते अपघात नऊ टक्के तर त्रासाबाबत आठ टक्के लोकांनी पोलिसांना माहिती दिली आहे. सात टक्के तक्रारी ज्येष्ठ नागरिकांच्या असून माहिती देण्यासाठी पाच टक्के लोकांनी संपर्क साधला आहे. हल्ला झाल्याबाबत ८९ टक्के, प्राणघातक हल्ला झाल्याबाबत चार टक्के, चोरीबाबत दोन टक्के लोकांनी संपर्क साधला.
महिलांसंबंधी म्हणजे छळवणूक झाल्याबाबत ५५ टक्के, घरगुती हिंसाविषयी ४३ टक्के, उपद्रव दोन टक्के तर लैंगिक छळवणूकबाबत एक टक्के लोकांनी पोलिसांसमोर आपले. म्हणणे मांडले आहे. रस्ता अपघातात गंभीर अपघात झाल्याबाबत ५१ टक्के, किरकोळ अपघात ४३ टक्के, अपघात करुन पळ काढण्यासंदर्भात (हिट ॲण्ड रन) सहा टक्के, ध्वनी प्रदुषणाविषयी ३२ टक्के, मदत हवी असल्याने २९ टक्के, आत्महत्या करण्याचा विचार असल्याबाबत १९ टक्के तर वाहतूक कोंडी झाल्याबाबत-१७ टक्के, सोनसाखळी चोरी एक टक्के लोकांनी संपर्क साधला आहे.
ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तणूक करत असल्याबाबत ६६ टक्के, घरगुती हिंसा होत असल्याची नोंद ३४ टक्के लोकांनी केली आहे..लोकांनी वेगवेगळ्या घटनांचीही माहिती पोलिसांपर्यंत पाठवली आहे. यात प्रामुख्याने मद्यपींविरुध्द, ३९ टक्के दारू विकत असल्याबाबत १८ टक्के सट्ट्याविषयीच्या तक्रारी आहेत. या तक्रारींवरुन कोणत्या प्रकारचे गुन्हे अधिक प्रमाणात घडत आहेत, हे समजण्यास पोलिसांना मदत होणार आहे. तसेच त्यादृष्टीने उपाययोजना करणे शक्य होणार आहे.