जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लवकरच जाहीर होईल. युतीबाबत घोषणा केली जात असली तरी, मित्र पक्षांमधील विसंवाद अनेक ठिकाणी पुढे येऊ लागला आहे. तीनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शक्य तेथे युती करूनच निवडणूकीला सामोरे जाऊ असे सांगितले असले तरी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबण्याची चिन्हे नाहीत.

जळगाव जिल्ह्यात युती होण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री गुलाबराव पाटील प्रयत्न करत असताना, त्यांचेच सहकारी आमदार किशोर पाटील यांनी स्वबळाची भाषा केली . शिवसेना आणि मित्र पक्षांना संपवायचे, ही भाजपची रणनीती असल्याचा आरोप त्यांनी केला. किशोर पाटील हे पाचोरा-भडगावचे आमदार आहेत. पाचोरा-भडगावमध्ये शिंदे गट स्थानिक निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणाही पाटील यांनी केली.

पाटील यांच्या प्रमाणेच रत्नागिरीतही शिंदे गटाचे ज्येष्ठ मंत्री उदय सामंत यांनी महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले. वरिष्ठ नेते एकत्र निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र स्थानिक पातळीवरील काही नेते युतीत खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सामंत यांनी चिपळूणमधील बैठकीत केला. यामुळे शिवसेना काय आहे हे तितक्याच आक्रमकपणे दाखवून देण्याची जबाबदारी आपली आहे. कोणाला खूमखुमी असेलच तर आपल्या धनुष्यबाण कसा चालतो हे त्यांना दाखवावे लागेल अशा शब्दात सामंतांनी सुनावल्याने स्थानिक पातळीवर महायुतीमधील वाद पुढे आला.

पुण्यातही वितुष्ट

पुण्यातही भाजपविरोधात इतर दोन मित्रपक्षांचा रोष दिसतो. शनिवारवाड्यातील नमाजपठणाच्या आरोपानंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी रविवारी आंदोलन केले. यारच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी आक्षेप घेत, थेट कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिंदे गटाचे पुणे शहरप्रमुख रवींद्र धंगेकर हेही भाजपविरोधात भूमिका घेताना दिसतात. पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी याबद्दल तंबी दिल्यानंतर दोनच दिवसांत त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार असल्याचेही धंगेकर यांनी नमूद केले.