नाशिक – २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भूसंपादन हे प्रशासनापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी आता जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या घटकांच्या बैठका घेऊन ते त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली.

कुंभमेळ्यासंदर्भात बैठकांचा सध्या धडाका सुरु आहे. तीन दिवसांपूर्वी साधू-महंतांची बैठक त्र्यंबकेश्वर येथे झाली होती. राज्य शासनाने स्थापन केलेल्या सिंहस्थ कुंभ शिखर समितीत महायुतीतील मंत्र्यांसह शासकीय अधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले असताना साधू-महंतांना मात्र त्या समितीत स्थान नाही. यासंदर्भात त्र्यंबकेश्वर येथे साधू-महंतांसह १३ आखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीत समितीत कोणत्याही आखाड्याच्या प्रतिनिधींचा समावेश नसल्याने साधू-महंतांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीस आखाडा परिषदेचे प्रवक्ते भक्तिचरणदास महाराज यांच्यासह इतर साधू, महंत उपस्थित होते. या समितीची फेररचना करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

साधू-महंतांची नाराजी दूर करण्याचे आव्हान असताना कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाकरिता शेतकऱ्यांना राजी करण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरु झाले आहेत. यासंदर्भात त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी पवन दत्ता (इगतपुरी- त्र्यंबकेश्वर), भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ, तहसीलदार श्वेता संचेती, मुख्याधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते.

आवश्यक भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनेच राबविण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने घाट आणि ३० मीटर रस्त्यांसाठी त्र्यंबकेश्वर हद्दीतील जमीन अधिग्रहण करण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया, अन्य बाबींची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले. या आवाहनाला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले. भूसंपादन अधिकारी वाघ यांनी भूसंपादन करावयाच्या क्षेत्राची माहिती दिली. मुख्याधिकारी पाटील यांनी स्वागत केले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे कामांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. त्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य मिळवावे लागणार आहे. साधू, महंतांच्या नाराजीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.