जळगाव : हनी ट्रॅप प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारणी गुंतले असल्याचा संशय असतानाही सरकार आपल्या सोयीप्रमाणे तपास करत आहे. या प्रकरणात निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी टाळण्यासाठी सरकारकडून मुद्दाम वेळकाढूपणा केला जात आहे, असा आरोप शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी येथे केला. सोयीस्कर निकाल लावण्यासाठी पोलीस तपासादरम्यान हाती लागलेले पुरावे सुद्धा पुढे नष्ट केले जातील, असाही दावा त्यांनी केला.

हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढा याच्याशी असलेल्या संबंधावरून मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य करून त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीकेचे बाण सोडले जात आहेत. विशेषतः आमदार एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्या विरोधात अलिकडे मोहीमच उघडली आहे. खडसे हे महाजन यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसताना, त्यांच्या वक्तव्यांचा निषेध करून भाजपचे जळगावमधील सर्व आमदार महाजन यांच्या मदतीला धावून आले. त्यापैकीच एक चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार खडसे यांना लक्ष्य करतानाच त्यांच्याविषयी अपशब्द वापरले. त्यामुळे संतापलेले आमदार खडसे यांनी शनिवारी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिले.

हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन तब्बल १५ दिवस उलटले आहेत. त्यानंतरही या प्रकरणाच्या तपासात ठोस प्रगती झालेली दिसून येत नाही. अद्यापही पोलिसांकडून तपासात नेमके काय निष्पन्न झाले आहे तसेच किती लोक संशयाच्या भोवऱ्यात आहेत, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती माध्यमांसमोर आलेली नाही. या संदर्भात बोलताना आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, तपास यंत्रणांकडून माध्यमांना अद्याप एकही पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आलेली नाही. ही गोपनीयता आणि संथगती तपास पाहता सरकारकडून तपास यंत्रणेचा वापर करून संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय अधिकच बळावतो. या प्रकाराने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. जर दोषींवर कारवाई झाली नाही आणि दोषींना पाठीशी घातले गेले तर हा एक अत्यंत धोकादायक पायंडा पडेल, असेही खडसे म्हणाले.

हनी ट्रॅप प्रकरणात भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव येणे हे देखील दुर्दैवी आहे. यापूर्वीही एका पत्रकाराने दाखविलेल्या चित्रफितीतून मंत्री महाजन यांच्यावर एका उच्चपदस्थ अधिकारी महिलेशी संभाषण केल्याचा आरोप झाला होता. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभागृहात महाजन यांच्या खासगी आयुष्याविषयी मागे बरेच काही बोलले होते, याकडेही एकनाथ खडसे यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.