जळगाव – जिल्ह्यातील पाचोऱ्यात काही वर्षांपासून शिवसेनेची (एकनाथ शिंदे) एकहाती सत्ता असताना, भाजपने सर्व विरोधकांना पक्षात प्रवेश देऊन विद्यमान आमदाराला शह देण्याच्या हालचाली अलीकडे वाढविल्या आहेत. त्यानंतर आता भाजपच्या एका माजी आमदाराने शेतकऱ्यांच्या मदत निधीत झालेल्या घोटाळ्यावर सोयीस्कर मौन बाळगल्याचा आरोप करून शिंदे गटाच्या आमदाराला लक्ष्य केले आहे.

गेल्या महिन्यात पाचोरा आणि भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी हवालदिल होऊन बसले. या पार्श्वभूमीवर, आपण नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली.

अखेर त्या मागणीला यश आले आणि राज्यातील सरसकट मदत जाहीर झालेल्या तालुक्यांच्या यादीत दोन्ही तालुक्याचा समावेश झाल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केला आहे. मात्र, भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यावरून आमदार पाटील यांना आता लक्ष्य केले आहे. आजी-माजी आमदारांमध्ये त्यामुळे चांगलीच जुंपली आहे.

पाचोरा तालुक्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र, पाचोरा महसूल विभागातील अव्वल कारकूनाने शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या गंभीर प्रकरणावर आमदार किशोर पाटील यांनी अद्याप मौन का बाळगले आहे, असा प्रश्न माजी आमदार दिलीप वाघ यांनी उपस्थित केला आहे.

या संपूर्ण प्रकरणामागे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग तर नाही ना, म्हणूनच आमदार पाटील शांत आहेत का, अशीही शंका माजी आमदार दिलीप वाघ यांनी घेतली आहे. आमदार पाटील यांनी पाचोरा-भडगाव तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी मिळवून दिल्याचा दावा केल्यानंतर माजी आमदार वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांना लक्ष्य केले. पाचोरा तालुक्यात २०२३–२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

राज्य सरकारने त्या वेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, पाचोरा महसूल विभागातील अव्वल कारकून अमोल भोई याने शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणारी रक्कम थेट इतर खात्यांवर वळवून तब्बल दोन कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप झाला. या प्रकरणात काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही अडकविण्यात आल्याचे समोर आले आहे.

हा गैरव्यवहार केवळ दोन कोटी रुपयांपुरता मर्यादित नसून, यापूर्वीही अशा स्वरुपाचे प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एकूण सुमारे आठ ते १० कोटी रूपयांचा हा घोटाळा असल्याचे माजी आमदार वाघ यांनी स्पष्ट केले. आमदार पाटील शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा करतात. मग दोन कोटींच्या घोटाळ्यावर का बोलत नाही, असेही त्यांनी म्हटले.