नाशिक : शहरातील भोसला शाळेच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याचे लक्षात घेऊन वन विभागाने शोध मोहीम राबवली. ड्रोनची मदत घेतली गेली. ट्रॅम कॅमेरे लावण्यात आले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत बिबट्या पकडला गेला नसल्याने मंगळवारी शाळेला सुट्टी देण्यात आली. भोसला परिसरात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याची सकाळी तपासणी केली असता त्यामध्ये रान मांजरचा वावर टिपला गेला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

महात्मा नगर परिसरातील बिबट्याचा थरार नाशिककरांनी मागील आठवड्यात अनुभवला होता. यापूर्वी बिबट्याने शहरात शिरकाव करीत धुमाकूळ घातल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सोमवारी जेव्हा भोसला शाळेच्या आवारात बिबट्या दिसल्याची वार्ता पसरली, तेव्हा धावपळ उडाली होती. एक शाळा मधल्या सुट्टीनंतर सोडून द्यावी लागली. महाविद्यालयीन युवकांना घरी पाठविले गेले. पालकांपर्यंत निरोप पोहचवितांना शाळेची दमछाक झाली. आसपास राहणारे पालक मुलांना घेण्यासाठी शाळेत धडकले. काहींना शाळेच्या विद्यार्थी वाहतूक वाहनाच्या माध्यमातून घरापर्यंत सोडण्यात आले. दुसरीकडे वन विभाग ड्रोन आणि अन्य माध्यमातून बिबट्याला शोधण्यासाठी मोहीम केली. मोठ्या प्रमाणावर गवत असल्याने या मोहिमेत अडचण आली. सायंकाळपर्यंत कुठल्याही पाऊलखुणा आढळल्या नाहीत. बिबट्या पकडला गेला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून व्यवस्थापनाने मंगळवारी शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यानच्या काळात नेहमीप्रमाणे अफवांचे पीक आले होते. मागील आठवड्यात दोन बिबट्यांना पकडल्यानंतर फसव्या भ्रमणध्वनीमुळे वन विभाग त्रस्त आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये. संपूर्ण माहितीचे तथ्य तपासल्याशिवाय वा खात्री केल्याशिवाय कोणत्याही चुकीच्या बातम्या, अफवा पसरवू नये. कुठेही बिबट्याचा वावर आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन वन विभागाने केले. भोसला परिसरात विविध ठिकाणी आठ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्याची शाळा प्रशासनाच्या मदतीने तपासणी करण्यात आली.

शाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी जनजागृती सत्र राबविले गेले. शाळा प्रशासनाने परिसरात वाढलेले गवत काढण्याचे काम सुरू केले. रात्री वन विभागाने थर्मल ड्रोन व इतर माध्यमातून शोध मोहीम तसेच गस्त करण्यात आली. मंगळवारी सकाळी वन विभागाने ट्रॅप कॅमेऱ्यांची तपासणी केली असता त्यामध्ये रान मांजरचे छायाचित्र मिळाले. शाळेच्या आवारातील हे रान मांजर बहुदा बिबट्याचे पिल्लू वाटले असावे, असा वन विभागाचा अंदाज आहे. ही मोहिम सुरू राहिल असे वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी सांगितले.