जळगाव : शहरात चालविल्या जात असलेल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे यांना अटक झाल्याने शिवसेना (एकनाथ शिंदे) कोंडीत सापडली आहे. विदेशातील नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पक्षातील मोठा पदाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याही अडचणीत आता वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांना खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हटले जाते. सत्तेत सहभागी असताना सत्तेतील नेत्यांवर टीका करण्यासही ते बऱ्याच वेळा मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्यासमोर विरोधकांची तर अजिबात खैर नसते. विशेषतः ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याविषयी बोलताना त्यांना जास्त स्फुरण चढते. जळगावात प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी शेतीप्रश्न न सुटल्यास थेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा नुकताच दिला होता. तेव्हा तुम्ही माझ्या गावात येऊन तर दाखवा, असे आवाहन मंत्री पाटील यांनी बच्चू कडूंना दिले होते. असे असताना, पक्षाच्या माजी महापौराला बोगस कॉल सेंटर प्रकरणात अटक झाल्यापासून मात्र त्यांची आक्रमता कमी झाली आहे. घडल्या प्रकाराविषयी कोणतेच भाष्य त्यांनी आतापर्यंत केलेले नाही किंवा आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली नाही.

मनसेच्या माध्यमातून वयाच्या २१ वर्षी नगरसेवक बनलेल्या ललित कोल्हे यांनी मनसेच्या माध्यमातून पहिल्यांदा २००९ मध्ये जळगाव ग्रामीणमध्ये आणि त्यानंतर २०१४ मध्ये जळगाव शहरातून विधानसभेची निवडणूक लढली होती. तथापि, दोन वेळा प्रयत्न करूनही त्यांचे आमदारकीचे स्वप्न काही पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे कोल्हे यांनी जळगाव महापालिका लक्ष्य केली. माजी मंत्री सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीचा पाठिंबा मिळवत महापौर बनण्याचे स्वप्न साकारले. मनसे प्रमुख राज ठाकरे, माजी मंत्री जैन आणि मंत्री गिरीश महाजन यांनी कोल्हे यांना वेळोवेळी हात दिला. मात्र, कोल्हे यांनी दोन्ही-तिन्ही नेत्यांना कालांतराने हात दाखवला.

मनसे, भाजप, खान्देश विकास आघाडी फिरून आल्यानंतर ललित कोल्हे आता कुठे शिवसेनेत (एकनाथ शिंदे) स्थिरावले होते. आणि त्यांनी जळगाव महापालिकेची आगामी निवडणूक लढण्याची जोरदार तयारी त्यांनी केली होती. तत्पूर्वीच, बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशातील नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून ते पोलिसांच्या नजरेत आले. राजकीय वर्तुळात त्यामुळे खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपची बरोबरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिंदे गटाला पर्यायाने पालकमंत्री पाटील यांनाही माजी महापौर कोल्हे यांना अटक झाल्यानंतर मोठा हादरा बसल्याची चर्चा आहे. कारण, आपले पूर्वापार वर्चस्व असलेल्या प्रभागांमधून बऱ्यापैकी नगरसेवक निवडून आणण्याची युक्ती माजी महापौर कोल्हे यांच्याकडे होती. त्याच युक्तीचा वापर करून शिंदे गटाला महापालिकेत आपली ताकद वाढविण्याची संधी यंदाच्या निवडणुकीत होती.