जळगाव : भाजपमधून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे बाहेर पडल्यानंतर पक्षातील सर्व निर्णय प्रक्रियेत आता मंत्री गिरीश महाजन यांचे मत निर्णायक ठरत आहे. पक्षात कोणाला घ्यायचे किंवा नाही, हे देखील तेच ठरवताना दिसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही भाजपमध्ये सध्या महाजन यांचेच मार्गदर्शन आणि रणनीती प्रमुख आधार मानली जात आहे.
जिल्ह्यात भाजपने मंत्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये लक्षणीय यश मिळवले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्यानंतर, पक्षाला पुन्हा विजयाच्या मार्गावर नेण्यासाठी मंत्री महाजन यांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.
जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात युती होणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तरीदेखील, महाजन यांनी परिस्थितीचा अचूक अंदाज घेत भाजपमध्ये कार्यक्षम, जनतेशी जोडलेले आणि नवीन ऊर्जा असलेले चेहरे पुढे आणण्यावर भर दिला आहे. त्यांच्या या धोरणामुळे पक्षातील तरुण आणि नव्या विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, जुन्या विचारांच्या काही वरिष्ठ नेत्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये असमाधानाचे सूर उमटताना दिसत आहेत. नाराजांची फळी अचानक सक्रीय झाल्याने भाजपमध्ये आता पूर्वीसारखी एकवाक्यता राहिली नसल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यभरातील जिल्हा निवडणूक प्रमुख व निवडणूक प्रभारींच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. त्यातही मंत्री महाजन यांचाच वरचष्मा दिसून आला आहे. स्वतः नाशिक शहरासह नाशिक उत्तर-दक्षिण आणि मालेगावचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी स्वीकारून जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, जळगाव पूर्व आणि पश्चिमच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे सोपवली आहे. याशिवाय, आपल्या विश्वासातील सहकारी भाजप आमदार सुरेश भोळे यांच्याकडे जळगाव शहर, नंदू महाजन यांच्याकडे जळगाव पूर्व (रावेर) आणि चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे जळगाव पश्चिम निवडणूक प्रमुखाची धुरा सोपवण्याची काळजी मंत्री महाजन यांनी घेतली आहे. भाजपमध्ये सध्याच्या घडीला मंत्री महाजन सांगतील तेच धोरण आहे. त्याचा फायदा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किती प्रमाणात होतो, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बंडखोरांना पक्षात घेण्यावरून वाद
भाजपला जळगावमध्ये गेल्या महापालिका निवडणुकीत बहुमत मिळूनही पक्षाच्या काही नगरसेवकांच्या भूमिकेमुळे सत्तेबाहेर राहावे लागले होते. याशिवाय, विधानसभा निवडणुकीदरम्यान जळगावात काही नगरसेवकांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्याचा अनुभव पक्षाने घेतला होता. सध्या भाजपने फुटून ठाकरे गटाला जाऊन मिळालेल्या तसेच बंडखोर झालेल्या नगरसेवकांसाठी पक्षाची दारे तातडीने खुली न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या पुनर्विचारासाठी आणि पुनर्प्रवेशाच्या शक्यतेवर विचार करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. प्रत्यक्षात, पाचोऱ्यातही अमोल शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत महायुती विरोधात उमेदवारी करून बंडखोरी केली होती. मात्र, भाजपने शिंदे यांना लगेचच पक्षात सन्मानाने घेतले. तोच न्याय इतर बंडखोरांना दिला जात नसल्याने मंत्री महाजन यांच्या सोयीस्कर भूमिकेबद्दल पक्षातून नाराजी व्यक्त होत आहे.
