जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत ट्रॅम्प टॅरिफच्या प्रभावामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असताना, आता चांदीही भाव खाऊ लागली आहे. नवरात्रोत्सवापूर्वी शनिवारी सकाळी बाजार उघडताच तीन हजारांहून अधिक वाढ नोंदविण्यात आल्याने चांदीने नवा विक्रम केला. सोन्यातही बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसून आले.
आठवड्याच्या शेवटच्या व्यापार सत्रात सोन्याने सकारात्मक सुरुवात केल्याने खरेदीत लक्षणीय वाढ दिसून आली. या वाढीमागे अनेक घटक कार्यरत आहेत. ज्यामध्ये या वर्षातील एक्सचेंज-ट्रेडेड फंडांमधील मजबूत गुंतवणूक तसेच मध्यवर्ती बँकांकडून सुरू असलेली मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी महत्त्वाची ठरली. याशिवाय वर्ष अखेरीस यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आणखी कपात करेल, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे. त्यासोबतच जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणाव आणि व्यापाराशी संबंधित अनिश्चितता यामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानून मागणी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्याने सोन्याच्या खरेदीत पारंपरिक उत्साह दिसून येतो, मात्र वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या खर्चावर ताण पडण्याची शक्यता देखील आहे.
नवरात्रोत्सव, दिवाळी यांसारख्या प्रमुख सणांमध्ये सोन्याची मागणी नेहमीच वाढते. तज्ज्ञांच्या मते, सध्या दिसणारी किंमतवाढ ही डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या कमजोरीमुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या मजबूत स्थितीमुळे झाली आहे. जर हा कल पुढेही कायम राहिला, तर आगामी काळात सोने खरेदी करणे आणखी खर्चिक ठरू शकते. जळगावमध्ये गेल्या मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम एक लाख १४ हजार ८४५ रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर ग्राहकांना सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार अनुभवण्यास मिळाले. मात्र, शनिवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ८२४ रूपयांनी वाढ नोंदवली गेल्याने सोने पूर्ववत एक लाख १४ हजार ८४५ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. दसरा, दिवाळी आणि आगामी लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याची किंमत कमी होण्याची आशा बाळगून असलेल्या ग्राहकांसह व्यावसायिकांची त्यामुळे निराशा झाली.
चांदीची मोठी झेप
जळगावमध्ये ११ सप्टेंबरला चांदीचे दर एक लाख ३१ हजार ३२५ रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने चढ उतार सुरूच राहिले. तशात शनिवारी सकाळी बाजार उघडताच चांदीत तब्बल ३०९० रूपयांची वाढ नोंदवली गेली. ज्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ३६ हजार ९९० रूपयांच्या नव्या उच्चांकावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत चांदीत एवढी वाढ नोंदवण्यात आली नव्हती. ग्राहकांसह व्यावसायिक चांदीचा तोरा पाहुन चांगलेच चक्रावले.