जळगाव : पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसानंतर अचानक पाण्याची आवक वाढल्याने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा जिल्ह्यातील हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता सुमारे एक लाख २० हजार ७४२ क्यूसेकने विसर्ग सुरू असताना, तापी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागासह जिल्हा प्रशासनाने दिला.

पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तापीसह वाघूर, गिरणा आणि अन्य बऱ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आवक वाढल्यानंतर हतनूर धरणाचे सहा दरवाजे सोमवारी पूर्णपणे, तर १४ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते. ज्यामुळे तापीच्या पात्रात सुमारे ६४ हजार ७३२ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. त्यानंतरही पाण्याची आवक वाढताना दिसून आल्याने पाटबंधारे विभागाने मंगळवारी सकाळी हतनूर धरणाचे ४१ पैकी १६ दरवाजे पूर्ण क्षमतेने आणि आठ दरवाजे एक मीटरने उघडण्याचा निर्णय घेतला. परिणामी, तापी नदीच्या पात्रात सुमारे एक लाख २० हजार ७४२ क्यूसेकने विसर्ग सुरू झाला. पाण्याची आवक वाढल्यानंतर पुढील काही तासांत एक लाख २५ हजार ते दीड लाख क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढवला जाऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.

दरम्यान, हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापन केंद्रांवर मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात सुमारे ४२९ मिलीमीटर (सरासरी ४७.७ मिलीमीटर) पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. पैकी बऱ्हाणपुरात २५.४, देढतलाईत ९२.६, टेक्सामध्ये १२४.४, एरडीत १४.२, गोपालखेड्यात ४९.४, चिखलदऱ्यात ११.८, लखपुरीत ५२.०, लोहाऱ्यात २९.२ आणि अकोल्यात ३०.२ मिलीमीटर पाऊस पडला. हतनूर धरणातील विसर्ग वाढल्याच्या स्थितीत शेळगाव बॅरेजचेही १८ दरवाजे आता एक मीटरने उघडण्यात आले आहेत. ज्यामुळे तापी नदीच्या पात्रात ४१ हजार ६९२ क्यूसेकने विसर्ग होत आहे. तापी आणि पूर्णा नदीच्या काठांवर राहणाऱ्या गावातील नागरिकांनी नदीच्या पात्रात न जाणे, पोहणे, मासेमारी करणे तसेच जनावरांना पाणी पिण्यास घेऊन जाणे टाळावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन जळगाव जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

गिरणा, वाघूरच्या साठ्यातही वाढ

जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा तसेच वाघूर धरणाच्या पाणी पातळीतही गेल्या काही दिवसांपासून चांगली वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १९ ऑगस्टअखेर पैकी गिरणा धरणात ६९.९३ टक्के तर वाघूर धरणात ७२.८२ टक्के उपयुक्त पाणी साठा निर्माण झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. जिल्ह्यातील इतर लहान व मध्यम प्रकल्पांच्या पाणी साठ्यातही बऱ्यापैकी वाढ अलिकडे होताना दिसली आहे. परिणामी, नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.