नाशिक – उत्तर महाराष्ट्रातील ३७ नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रदीर्घ काळापासून निवडणुकीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या इच्छुकांच्या राजकीय महत्वाकांक्षांना धुमारे फुटले आहेत. निवडणूक जाहीर झालेल्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ११, नंदुरबारमध्ये चार, जळगावमध्ये १८ आणि धुळे जिल्ह्यात चार नगर परिषद व नगरपंचायतीचा समावेश आहे. त्र्यंबक नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे कुंभमेळ्याच्या कामांंवर परिणाम होण्याची धास्ती व्यक्त केली जात आहे.
या निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असून त्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत बहुसदस्यीय पद्धती असून एका प्रभागात सर्वसाधारणपणे दोन जागा असतात. एकूण सदस्य संख्येच्या विषम आकडा असलेल्या नगर परिषदेत एका प्रभागात तीन जागा असतात. थेट अध्यक्षपदासाठी मतदान होत असल्याने एका मतदाराने तीन ते चार जागांसाठी मत देणे अपेक्षित असल्याचे आयोगाने म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यात भगूर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवड, इगतपुरी, ओझऱ, पिंपळगाव बसवंत आणि त्र्यंबकेश्वर. या ११ नगर परिषदा आणि नगर पंंचायतींमध्ये निवडणूका होणार आहेत.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने तब्बल २५ हजार कोटींचे विकास कामांचे आराखडे शासनाला सादर केले आहेत. लांबलेल्या पावसामुळे मान्यता मिळालेल्या, कार्यारंभ दिलेल्या बहुतांश कामांना अद्याप प्रत्यक्षात सुरुवात होऊ शकली नाही. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कुंभमेळ्यासाठी विविध कामांचे नियोजन आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता विस्तारीकरण, त्र्यंबकेश्वरमध्ये घाट बांधणे, बॅरेज, उपसा सिंचन योजना मलनि:स्सारण प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, वीज वितरण कंपनीला उपकेंद्र उभारणीसाठी शेकडो कोटींचा निधी कुंभमेळा प्राधिकरणाकडे प्राप्त झालेला आहे. ज्या कामांना मंगळवारपर्यंत मान्यता मिळू शकली नाही ती आचारसंहितेच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या कामांना अद्याप मान्यता मिळालेली नाही, त्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घ्यावी लागणार असल्याचे म्हटले आहे. आचारसंहितेमुळे या कामात कुठलाही विलंब होऊ नये असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. निविदा प्रक्रिया राबवणे, कार्यारंभ आदेश देणे आदींसाठी यंत्रणेला निवडणूक आयोगाकडे वारंवार धाव घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.
