नाशिक – पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री व्यवहाराच्या विरोधात सकल जैन समाजाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या जागेचा बेकायदेशीर व्यवहार रद्द करून आमचे वसतीगृह आम्हाला परत देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेचा वाद मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या जागेच्या व्यवहारामध्ये भाजपचे केद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकरांकडून सातत्याने होत आहे. दुसरीकडे संबंधित बांधकाम व्यावसायिक हा भागीदार नसल्याचा मंत्री मोहोळ यांचा दावा आहे. पुण्यात जैन संघटनांच्या बैठकीत जैन समाजाच्या बोर्डिंग जमिनीच्या विक्रीच्या व्यवहार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी मूक मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले होते. या घटनाक्रमात रवींद्र धंगेकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याची मागणी केली आहे. या जमिनीचा व्यवहार रद्द न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणाचे पडसात सोमवारी नाशिकमध्ये उमटले. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन बेकायदेशीर विक्री व्यवहाराच्या विरोधात सकल जैन समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सचिन गांग, सुमेर काला, महेश शहा, संतोष मंडलेचा पवन पटणी, प्रमोद लोहाडे, रंजन शहा, सुनील कासलीवाल, राहुल कासलीवाल, सोनल कासलीवाल- दगडे, कल्पना बुरड, अजित सुराणा, रवींद्र पाटील यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आज पुण्यात असा प्रकार घडला, उद्या कुठेही होऊ शकतो. त्यामुळे एक रहा, सजग रहा, असे आवाहन सकल जैन समाजाकडून करण्यात आले होते. जागेचा व्यवहार रद्द करून पुण्यातील ती जागा जैन समाजाच्या ताब्यात रहावी, अशी मागणी करण्यात आली. जैन हा शांतताप्रिय समाज आहे. याचा अर्थ कदापि असा घेऊ नये की आम्ही जैन बोर्डिंगची जागा हातातून जाऊ देऊ. लाखो विद्यार्थ्यांनी तिथे शिक्षण घेतले. तिथे आमचे देवस्थान आहे. श्रद्धा व आस्थेचे ठिकाण आहे. जिथून लाखो मुले घडवले जातात, जागा गेल्यास अशा मुलांच्या शिक्षणाचा लाभ होणार नाही. जे दान एकदा दिले जाते, कुठल्याही परिस्थितीत घेतले जात नाही. ती जागा ट्रस्टची आहे, नेहमीसाठी ट्रस्टची राहणार. ती जागा आम्ही पुन्हा मिळवून राहू असे मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी सूचित केले.
