नाशिक : शहर परिसरातील गुन्हेगारी कारवाया वाढत असून टवाळखोरांकडून वाहनांवर दगडफेक, तोडफोड असे प्रकार नित्याचे झाले असताना जुने नाशिक परिसरातील कुंभारवाडा येथे बुधवारी पहाटे दुचाकींसह चारचाकी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांचा धाक नसल्यानेच अशा घटना वारंवार घडत असल्याची प्रतिक्रिया नाशिककरांमध्ये व्यक्त केली जात आहे. संशयितांविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. खून, सोनसाखळी चोरी, भ्रमणध्वनी चोरी, लुटमार, वाहनांवर दगडफेक असे प्रकार वाढल्याने नाशिककरांमध्ये अस्वस्थता आहे. पोलिसांकडून टवाळखोरांना पकडून त्यांची त्या त्या परिसरात फेरी काढण्यात येत असली तरी टवाळखोर पोलिसांना जुमानत नसल्याचे दिसत आहे. तेच जुने नाशिकमधील कुंभारवाडा येथे घडलेल्या घटनेवरुन दिसून येत आहे. कुंभारवाड्यातील शितळादेवी मंदिराजवळील एका गल्लीत लावलेल्या पाच दुचाकी, मालवाहतूक वाहन, हातगाडी संशयितांनी बुधवारी पहाटे पेटवून दिल्या. कोणीतरी वाहने पेटवून दिल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच आगीच्या लपेट्यात असलेली वाहने बाजूला काढून पाणी मारत आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाचही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून केवळ त्यांचे सांगाडे शिल्लक राहिले आहेत. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष आणि भीतीही पसरली आहे.

हेही वाचा : नाशिक : आरोग्य विद्यापीठाचा शुक्रवारी दीक्षांत सोहळा

या वाहनांपैकी एका वाहनाची १५ दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती. त्या वाहनाला मंगळवारी सायंकाळीच नंबरपट्टी लावण्यात आली होती. पहाटे दोनच्या सुमारास वाहनांच्या काचा तसेच पेट्रोलच्या टाक्या फुटल्याचा आवाज झाल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी घराबाहेर पडत वाहनांना लावण्यात आलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. या जाळपोळीत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, शहरात मागील सहा महिन्यात तीन वेळा असा प्रकार घडला असून आतापर्यंत या परिसरातील आठ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. टवाळखोरांकडून दहशत माजवण्यासाठी सातत्याने असे प्रकार केले जात असल्याने या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. वाहन जाळपोळीविषयी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा : नंदुरबार : भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर १५० पेक्षा जास्त जणांना विषबाधा

“अज्ञातांनी कुंभारवाड्यातील शितला माता मंदिराजवळील गल्लीत वाहनांची जाळपोळ केली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोध सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी या परिसरात दोन वाहनांची जाळपोळ झाली होती. त्यातील आरोपी सध्या मध्यवर्ती कारागृहात आहे.” – गजेंद्र पाटील (निरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे)

दोन घटनांमध्ये वाहनांची तोडफोड, आता जाळपोळ

शहरात काही दिवसांपासून खून, लुटमार, वाहन तोडफोडीचे प्रकार सातत्याने घडत असल्याने नाशिककरांमध्ये अस्वस्थता आहे. वाहनांशी संबंधित १० दिवसातील ही तिसरी घटना आहे. गंगापूर गावाजवळ मद्यपींनी ये-जा करणाऱ्या चार ते पाच वाहनांवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडल्या होत्या. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत त्यांची परिसरातून फेरी काढली होती. यापुढे असा प्रकार करणार नसल्याचेही त्यांच्याकडून वदवून घेतले होते. त्यानंतर श्रमिकनगर परिसरात वाहने तोडफोडीचा प्रकार घडला. पोलिसांनी संशयितांना पकडून त्यांचीही परिसरातून फेरी काढली. पोलिसांना आव्हान देत टवाळखोरांनी बुधवारी पहाटे कुंभारवाड्यात वाहनांची जाळपोळ केली. पोलिसांनी गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.