जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवाळीच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात मोठी तेजी पाहण्यास मिळाली होती. मात्र, त्यानंतर कमी अधिक फरकाने सातत्याने चढ-उतार सुरूच असल्याने सोने आता ९१०० रूपयांनी, तर चांदी १३००० रूपयांनी स्वस्त झाली आहे. ग्राहकांसह व्यावसायिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या बाजारात जास्त करून चढ-उताराचे वातावरण पाहायला मिळाले आहे. काही दिवस सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती, तर काही दिवस दरात घसरणही झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, डॉलरच्या मूल्यातील बदल आणि गुंतवणूकदारांच्या हालचाली यांचा एकत्रित परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. आठवडाभरापासून सोन्याचे दर घसरले असले, तरी घसरण मर्यादित स्वरूपाची राहिली आहे. म्हणजेच सोन्याच्या दरातील घसरणीचा वेग आता कमी झाल्याचे दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) तसेच देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत थोडेसे कमी झाले आहेत. सध्या बाजारात स्थैर्याची चिन्हे दिसत असली, तरी आगामी काळात जागतिक आर्थिक घडामोडी, डॉलर-रुपया विनिमय दर आणि सणासुदीची मागणीवर सोन्याच्या किंमतींचा कल अवलंबून राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये विशेष दखल घेण्यासारखी हालचाल दिसून आलेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात किरकोळ चढ-उतार असूनही देशांतर्गत बाजारपेठेत दर जवळपास स्थिर राहिले आहेत. धनत्रयोदशी-लक्ष्मीपूजनानंतर झालेली किंमतीतील घसरण थांबून दोन्ही धातुंचे दर थोडे स्थिरतेकडे झुकले आहेत. लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही बाजारातील हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक परिस्थिती पाहता भविष्यात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी तेजी किंवा घसरण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी हा काळ तुलनेने अनुकूल ठरू शकतो. खरेदी किंवा गुंतवणुकीचा निर्णय घेताना बाजारातील हालचालींवर सतत लक्ष ठेवणे फायदेशीर ठरेल.

जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख ३२ हजार ८७० रूपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर घसरण सुरूच राहिल्याने बुधवारपर्यंत सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह एक लाख २३ हजार ७०३ रूपयांपर्यंत खाली आले. सोन्यात सुमारे ९१६७ रूपयांची घट सोन्यात नोंदवली गेली. अशाच प्रकारे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ६९ हजार ९५० रूपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर घसरण सुरूच राहिल्याने बुधवारपर्यंत चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह एक लाख ५६ हजार ५६० रूपयांपर्यंत खाली आले. चांदीत सुमारे १३ हजार ३९० रूपयांची घट चांदीत नोंदवली गेली.