जळगाव : जिल्ह्यातील भडगावात एका चहाच्या हॉटेलमध्ये रविवारी गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाल्याने हॉटेल मालकासह त्यांचा मुलगा आणि इतर ग्राहकांसह १३ जण जखमी झाले होते. त्यापैकी हॉटेल मालकाच्या मुलावर प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती संभाजीनगरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मृत्युशी झुंज देत असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.

भडगाव येथे बसस्थानक परिसरातील हॉटेल मिलनमध्ये चहा पिण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली असता, त्याचवेळी अचानक मोठ्या स्फोटासारखा आवाज झाला. प्राथमिक अंदाजानुसार, हॉटेलमधील फ्रिजच्या कॉम्प्रेजरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा होती. आगीचा भडका उडाल्याने जखमी झालेल्यांना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, काहींची प्रकृती जास्त चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पाचोरा, जळगाव तसेच धुळे येथील खासगी आणि शासकीय रूग्णालयांत हलविण्यात आले. रुग्णवाहिका चालक निळू पाटील, भैया पाटील, सागर पाटील व गोलू शिंदे यांनी पुढाकार घेत जखमींना वेळीच रुग्णालयात पोहोचवले. त्यांच्या तत्परतेमुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बसस्थानक परिसरात दिवसभर प्रवासी व नागरिकांची वर्दळ असलेल्या पारोळा चौफुलीवर झालेल्या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हॉटेलवर चहा पिण्यासाठी बरेच जण थांबले असतानाच फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. त्यात हॉटेल मालकासह त्यांचा मुलगा व इतर ग्राहक होरपळले. स्फोट झाल्याचा मोठा आवाज ऐकून आजुबाजुच्या घरांमधील नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली होती. परंतु, पोलीस निरीक्षक महेश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्फोटाचे कारण शोधण्यास सुरूवात केली. त्यातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.

प्राथमिक अंदाजानुसार, हॉटेलमधील फ्रिजच्या कॉम्प्रेसरने पेट घेतल्यामुळे हा स्फोट झाल्याचे सांगितले जात होते. परंतु, पोलिसांनी तपास केला असता हॉटेल मालकाच्या मुलाने संपलेले सिलिंडर बदलल्यानंतर गॅस गळती सुरू झाली. आणि आगीचा भडका उडाल्याचे कारण समोर आले. दरम्यान, आगीचा भडका उडाल्याने जखमी झालेल्यांपैकी हॉटेल मालकाचा मुलगा सोहिल रफीक मणियार (२८) याची प्रकृती जास्त चिंताजनक होती. त्यामुळे त्याच्यावर आधी धुळे शहरात त्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, मृत्युशी झुंज देत असतानाच त्याचे गुरूवारी सायंकाळी निधन झाले. भडगाव येथे शुक्रवारी शोकाकूल वातावरणात त्याचा दफनविधी करण्यात आला.