जळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टीसह पुराच्या पाण्यामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. नैसर्गिक आपत्तीचा केळी उत्पादकांनाही मोठा फटका बसला आहे. मोठ्या कष्टाने वाढवलेली केळी अचानक भुईसपाट झाल्यानंतर डोक्यावरील कर्जाच्या चिंतेने आता संबंधित सर्व शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके उद्धवस्त झाली होती. पावसाळा सुरू झाल्यानंतरही अतिवृष्टीसह पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. एकमेव सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत सुमारे एक लाख ६४ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी, कपाशी, मका, सोयाबीन, कांदा, भाजीपाला आणि फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यामुळे ८०० पेक्षा अधिक गावातील दोन लाखाहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. अतिवृष्टीनंतर नद्या-नाल्यांना मोठे पूर आल्याने जुलै-ऑगस्ट महिन्यात लागवड झालेल्या केळीच्या बाग अनेक ठिकाणी पाण्याखाली गेल्या आहेत. आधीच काढणीवर आलेल्या केळीला बाजारात भाव नाही, त्यात नवीन लागवडीच्या केळीवर पुराचे पाणी फिरल्याने संबंधित सर्व शेतकरी हतबल झाले आहेत.

धरणगाव तालुक्यातील चांदसरचे तरूण शेतकरी भूषण राजेंद्र पाटील यांनीही ऑगस्टमध्ये दोन एकरावर केळी लागवड केली होती. चांगल्या उत्पादनाच्या आशेने केळीच्या जोमदार वाढीसाठी त्यांनी आतापर्यंत सुमारे ७० हजार रूपयांचा खर्चही केला होता. आधीची दोन एकरावरील केळी कमी बाजारभावामुळे नुकसानीत गेल्याने नव्या लागवडीच्या केळीपासून तरी दोन पैसे जास्तीचे मिळतील, अशी आशा भूषण पाटील यांना होती. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांकडून तसेच इकडून तिकडून पैसे उचलून केळीचे पीक वाढविण्यात कोणतीच कसर ठेवली नव्हती. बँकेकडून ट्रॅक्टरसाठी आधीच सहा लाखांचे आणि ट्यूबवेलसह शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी सुमारे १० लाखांचे कर्ज घेतले आहे. पैकी ट्रॅक्टरच्या कर्जापोटी दर सहा महिन्यांनी एक लाख रूपये आणि शेतीसाठी घेतलेल्या कर्जापोटी दरमहा १९ हजार रूपयांचा हप्ता त्यांना न चुकता भरावा लागतो.

अशा स्थितीत, केळीच्या बागेचे मोठे नुकसान झाल्याने भूषण पाटील यांच्या डोळ्यासमोर आता अंधार पसरला आहे. आयटीआयचे शिक्षण घेऊन दूर कुठेतरी कारखान्यांमध्ये १०-१२ हजाराची नोकरी करण्यापेक्षा शेतीतून चांगले उत्पादन काढण्याची जिद्द त्यांनी बाळगली होती. मात्र, बाजारभावाची अनिश्चितता आणि नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या स्वप्नांवर आता पाणी फेरले आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर भूईसपाट झालेली केळीची बाग सावरण्यासाठी आणखी किमान दीड महिना लागेल. आणि तेवढा उशीर आता केळीपासून पुढे उत्पादन मिळण्यास देखील होईल. शेणखतांसह रासायनिक खते वापरून सुपिक बनवलेली माती पुरामुळे वाहुन गेल्याने पुन्हा नव्याने तितकाच खर्च करण्याशिवाय आता पर्याय नाही. अशा परिस्थितीत आधीच्या कर्जाचे हप्ते कसे फेडावे आणि नव्याने केळी उभी करण्यासाठी पैसा कुठुन आणावा, याची चिंता भेडसावत असल्याची व्यथा भूषण पाटील यांनी व्यक्त केली.