जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गावर भरधाव मोटार दुभाजकाला धडकल्याने पेटली. अपघातात महिलेचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर महिलेचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.जान्हवी संग्राम मोरे (२१), असे मृत महिलेचे नाव आहे. तर संग्राम जालमसिंग मोरे (२६, दोन्ही रा. कुलमखेडा, जि. बुलढाणा) हे गंभीर जखमी झाले आहेत. बोहर्डी (ता. भुसावळ) येथे माहेरी भेटीसाठी आलेल्या जान्हवी मोरे आणि त्यांचे पती संग्राम मोरे हे दोघे सोमवारी मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. तिथे त्यांचे औषध विक्रीचे दुकान आहे.

पहूर ते वाकोद दरम्यान दुपारच्या वेळी अचानक समोरच्या मालमोटारीने ब्रेक दाबल्याने मोरे दाम्पत्याची मोटार अनियंत्रित झाली. आणि थेट दुभाजकाला जाऊन धडकली. त्यानंतर लगेच इंजिनमधून धूर निघाला आणि मोटारीने पेट घेतला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी लगेच धाव घेतली. मोटारीच्या काच फोडून आत बसलेल्या जान्हवी मोरे आणि संग्राम मोरे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी संग्राम मोरे यांना मोटारीतून बाहेर काढण्यात यश आले. परंतु, मोटारीच्या मागील आसनावर बसलेल्या जान्हवी मोरे यांना बाहेर काढता आले नाही. आगीचे प्रमाण अचानक वाढल्याने त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांसह अग्नीशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण मोटार पूर्णपणे जळून खाक झाली. आगीत होरपळलेल्या महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करून अपघातात गंभीर जखमी झालेले त्यांचे पती संग्राम मोरे यांच्यावर पहूर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले गेले. पहूर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. पोलीस उपअधीक्षक बापू रोहम यांनी पहूर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन मृत व जखमींच्या नातेवाईकांची चौकशी केली. अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांना दिले.