जळगाव : जिल्ह्यात पोलिसांचा धाक न राहिल्याने खेळण्यातील बंदुकींप्रमाणे खऱ्याखुऱ्या बंदूक घेऊन फिरणाऱ्यांची संख्या अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशाच एका तरूणाने एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथे थट्टा मस्करी करत असताना, समोरच्यावर बंदूक रोखली. मात्र, गोळी थेट छातीत घुसल्याने मोठा अनर्थ घडला.

सोनू सुभाष बडगुजर (२४), असे जखमी तरूणाचे नाव आहे. सोनू आणि त्याचा मित्र जितेंद्र कोळी हे गावातील चौकात एकमेकांशी गप्पा मारतानाच थट्टा मस्करी करत होते. त्याच वेळी जितेंद्रच्या हातातील गावठी पिस्तूल सहज हाताळताना त्याचा ट्रीगर चुकून दाबला गेला. आणि गोळी थेट सोनू बडगुजरच्या छातीत घुसली. गोळी लागल्याने सोनू गंभीर जखमी होऊन जागेवर कोसळला.

उपस्थित ग्रामस्थांनी त्याला प्राथमिक उपचार देत तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे खेडी कढोली गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले. एरंडोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. जितेंद्र कोळी याच्याकडे गावठी बंदूक कुठून आले, त्याला परवाना होता का आणि ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याचा सखोल तपास केला जात आहे.

गोळीबारात जखमी कामगाराचा मृत्यू

जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीत अवैध दारू अड्ड्यावरील गोळीबारात दोन तरूण कामगार जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचार सुरू असताना पैकी एका तरुणाचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. राजन शेख रफिउल्ला (२०), असे मृत कामगाराचे नाव आहे.

औद्योगिक वसाहतीत जी सेक्टरमध्ये विजेता इंडस्ट्रीज नावाच्या कारखान्यात प्लास्टिक चटईचे धागे बनविण्यासाठी लागणाऱ्या दाण्यांची निर्मिती होते. त्या ठिकाणी रात्रपाळीवर कामास असलेला कामगार सरकू शेख हा कारखान्यात जाण्यापूर्वी समोरच्या पान टपरीवर साधारण १०.१५ वाजता गुटख्याची पुडी घेण्यासाठी गेला होता. त्याच वेळी शेजारी अवैध दारूचा अड्डा चालविणारा राहूल बऱ्हाटे हा सराईत गुन्हेगार अन्य एका व्यक्तीला शिवीगाळ व मारहाण करत होता. सरकू शेख याने पाहिले म्हणून राहुलला राग आला आणि त्याने सरकू शेख यालाही मारहाण करण्यास सुरूवात केली.

मारहाण झाल्यानंतर सरकू शेख त्याच्याबरोबर कारखान्यात काम करणाऱ्या दोन्ही भावांना तसेच इतर कामगारांना बाहेर घेऊन आला. मात्र, त्यांनाही राहुल याने शिवीगाळ केली. या दरम्यान, एका महिलेने राहुलला गावठी बंदूक आणून दिली. ज्या माध्यमातून त्याने बेछुट सहा राऊंड फायर केले. राहुलच्या गोळीबारामुळे राजन शेख रफिउल्ला (२०) आणि अहमद फिरोज शेख (२६) हे दोन्ही कामगार गंभीर जखमी झाले. गोळीबाराच्या घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संशयित राहुल बऱ्हाटे हा फरार असून, पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बऱ्हाटेवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.