मालेगाव : ग्रामपंचायतीच्या नावाने चक्क राज्य मार्गाच्या जागेत अतिक्रमण करुन व्यापारी गाळे थाटण्याचा प्रताप बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथे काही लोकांनी केला आहे. या गाळ्यांमुळे राज्य मार्गालगत असलेल्या शाळेच्या इमारतीला देखील धोका असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही यंत्रणांनी कारवाईचा बडगा उगारल्याने ग्रामपंचायतीची मात्र कोंडी झाल्याचे दिसत आहे. यामुळे सरपंच व उपसरपंच या दोघांवर पदे रद्द होण्याची टांगती तलवार देखील निर्माण झाली आहे.

काठरेदिगर ते चाळीसगाव या १९ क्रमांकाच्या राज्य मार्गावर डांगसौंदाणे गावालगत पर्यायी बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या वळण रस्त्यावर गावातील जिल्हा परिषद शाळेलगत काही लोकांनी व्यापारी गाळे उभारले आहेत. हे करताना सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले. तसेच हे गाळे ग्रामपंचायतीतर्फे बांधण्यात आले,असे भासविण्यात आले.

वास्तविक राज्य मार्गाच्या मध्य बिंदूपासून २० मीटर आणि रस्त्याच्या कडेपासून साडेचार मीटर मर्यादेत कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र त्याकडे डोळेझाक करत या अंतराच्या मर्यादेत अतिक्रमण करत हे व्यापारी गाळे थाटण्याचे धाडस केले गेले आहे.

या ठिकाणी जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे. शाळेच्या इमारतीच्या मागील बाजूला खेटून हे गाळे उभारण्यात आले आहेत. हे करताना शाळा इमारतीला लागून असलेला मातीचा थर खोदण्यात आला आहे. त्यामुळे शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. तसेच संरक्षण व शौचालयाची भिंत कोसळली आहे. त्यामुळे शाळेला पावसाच्या पाण्यामुळे देखील धोका निर्माण झाला असून गाळ्यांच्या बांधकामामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे.

अलीकडेच राजस्थानमध्ये शाळेची भिंत पडून सात विद्यार्थ्यांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच डांगसौंदाणे येथे शाळा इमारतीला धोका निर्माण करून व्यापारी गाळ्यांची उभारणी करण्याचा प्रकार घडल्याने शिक्षण विभागाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.

शाळा इमारतीला निर्माण झालेला धोका गृहित धरता शिक्षण विभागाने या शाळेच्या इमारतीची संरक्षणात्मक स्थिती व सुरक्षेचे मूल्यांकन (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिकच्या के.के.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. तेथील अभियंता अभिजीत पवार यांनी गावी भेट देऊन शाळेच्या इमारतीची नुकतीच तपासणी केली. याशिवाय राज्यमार्गावर अतिक्रमण केले म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ग्रामपंचायतीला तंबी देण्यात आली आहे.

वाहतूक सुरळीत व्हावी आणि अपघात टाळले जावेत, या उद्देशाने बाह्यवळण रस्ता निर्माण करण्यात आला आहे. परंतु त्यावरील अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास ग्रामपंचायतीला जबाब धरण्यात येईल तसेच सरपंच व उपसरपंच यांची पदे रद्द करण्यासाठी विभागीय महसूल आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल,असा इशारा या विभागातर्फे देण्यात आला आहे.

राज्यमार्गाच्या जागेत आठ गाळे बांधण्यात आल्याने अतिक्रमण झाल्याचे दिसत आहे, परंतु ग्रामपंचायतीने हे गाळे बांधले नाहीत आणि त्यासाठी आर्थिक खर्चही केलेला नाही. तरी पण या गाळ्यांमुळे शाळा इमारतीला धोका आहे किंवा कसे, हे जाणून घेण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट झाले पाहिजे, ही ग्रामपंचायतीची भूमिका आहे. या ऑडिटसाठीचे शुल्क ग्रामपंचायतीनेच अदा केले आहे. – एकनाथ बोरसे, ग्रामसेवक डांगसौंदाणे ग्रामपंचायत.