मालेगाव : मोकाट गायीच्या हल्ल्यानंतर सोयगाव नववसाहतमधील सुनंदा अहिरे या महिलेचा बळी गेल्यावर मालेगाव महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. मोकाट जनावरांना पकडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारतानाच मोकाट जनावरांना पकडण्यासाठीची मोहीम आणखी तीव्र करण्याचा इरादा आयुक्त रवींद्र जाधव यांनी जाहीर केला आहे.

सुनंदा अहिरे या गेल्या ११ सप्टेंबर रोजीच्या सकाळी अत्यंत वर्दळीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील ६० फुटी रस्त्यावर पायी फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका मोकाट गायीने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्या बेशुद्ध पडल्या आणि जागेवरच कोसळल्या. तेथे पायी फिरणाऱ्या अन्य नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात त्यांना जबर मार लागला. खांद्याचे हाड तुटल्याने शस्त्रक्रिया करावी लागली.

दरम्यान, शनिवारी त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले असले तरी मोकाट गायीच्या हल्ल्यानंतर ही घटना घडल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या सुस्तावलेल्या कारभारामुळे हा बळी गेल्याची प्रतिक्रिया शहरात उमटली आहे.

मालेगाव शहरात मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी जागरूक नागरिक व विविध संघटनांतर्फे महापालिकेकडे आजवर अनेकदा अर्ज विनवण्या करून झाल्या आहेत. गेल्या जून महिन्यात कळवण येथे मोकाट गाईंच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्याची दखल घेत महापालिकेने मोकाट जनावरे पकडण्यासाठी दोन पथकांची निर्मिती केली.

मात्र या पथकांकडून मोकाट जनावरे पकडण्याची अपेक्षित कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरात जागोजागी मोकाट जनावरांच्या झुंडी आढळून येत असल्यामुळे मूळ दुखणे ‘जैसे थे’असल्याचे चित्र आहे.

गायीच्या हल्ल्यानंतर महिलेला जीव गमवावा लागल्याच्या घटनेनंतर शहरवासीयांमध्ये महापालिका प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. या पार्श्वभूमीवर मोकाट जनावरे पकडण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

तसेच या कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मोकाट जनावरांची भरमसाठ संख्या लक्षात घेता अशा पथकांची संख्या वाढविण्याच्या सूचना देखील आयुक्त जाधव यांनी दिल्या आहेत. याशिवाय मोकाट जनावरे पकडल्यावर दंडात्मक कारवाई झालेल्या जनावर मालकांकडून पुन्हा ही जनावरे शहरात सोडून दिली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

नियमानुसार अशा मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे अपेक्षित आहे. परंतु त्यानुसार अद्याप एकही कारवाई झालेली नाही. तेव्हा यापुढे अशा जनावर मालकांविरोधात थेट पोलिसात गुन्हे दाखल करावेत, असे आदेश जाधव यांनी आता बजावले आहेत. तसेच मोकाट जनावरे पकडल्यानंतर ती सोडून देण्यासाठी काही राजकीय लोकांकडून कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रकार घडत असतात. यापुढे अशा राजकीय पुढार्‍यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील जाधव यांनी दिला आहे.