नाशिक : शहरात दारू दुकाने फोडणारा चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. शहर गुुन्हे शाखेच्या युनिट-दोन पथकाने १९० किलोमीटर अंतरातील सीसीटीव्हींच्या आधारे माग काढत ठाणे शहरातील मुंब्रा भागात चोरट्याचा मुसळधार पावसात पाठलाग करुन मुसक्या आवळल्या. संशयिताच्या ताब्यातून गुह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली. हा चोरटा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
रामनिवास उर्फ राम मंजू गुप्ता (३७, रा.सत्यभागा चाळ, टाटा पावर हाऊसजवळ, दिवा जि.ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जुलै महिन्यात नाशिक रोड येथील दारुचे दुकान चोरट्यांनी फोडले होते. याप्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल होताच शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोन पथकाने तपास सुरु केला होता. पथकाने घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पडघापर्यत तब्बल ११० किलोमीटर अंतरापर्यंत चोरट्याचा माग काढला. परंतु, तो हाती लागला नाही. चोरटा दारू दुकान फोडून मुंबईच्या दिशेने पसार होत असल्याचे स्पष्ट झाल्याने पथकासमोर चोरटा पकडण्याचे आवाहन उभे ठाकले होते.
एकीकडे चोरटा हाती लागत नसतांना सहा ऑगस्टच्या एकाच रात्री उपनगर आणि गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील दोन दारू दुकाने फोडण्यात आली होती. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटा दारू दुकानांमधील रकमेवर डल्ला मारून पसार होत असल्याने युनिट दोन पथकाने १९० किलोमीटर अंतरातील सीसीटीव्ही चित्रणांची तपासणी केली. पोलिसांनी ठाणेजवळील मुंब्रा गाठून कारवाई केली. काही दिवसांपासून मुंबईसह परिसरास झोपडणाºया पावसास न जुमानता पोलिसांनी संशयितास रेतीबंदर नंबर एक येथील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या शिळफाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
संशयिताच्या ताब्यातून गुह्यात वापरलेली ६० हजार रुपयांची दुचाकी हस्तगत करण्यात आली. संशयिताने शहरातील तीन गुह्यांसह ठाणे जिह्यातील पडघा येथेही दारू दुकान फोडल्याची कबुली दिली. संशयित सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द महाराष्ट्रासह गुजरात राज्यात ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके, युनिटचे प्रभारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक डॉ.समाधान हिरे,जमादार शंकर काळे, बाळू शेळके,हवालदार मनोहर शिंदे,सुनील आहेर,प्रकाश महाजन अंमलदार प्रवीण वानखेडे आदींच्या पथकाने केली.