जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपाला नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात उमेदवार न मिळणे ही शोकांतिका आहे. या मतदारसंघात त्यांचे संघटन नाही का, पक्षाचे नाक का कापले गेले, त्यांना उमेदवार का मिळाला नाही, याची उत्तरे भाजपाने द्यावीत, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने ऐनवेळी अर्ज न भरण्यामागे भाजपाचे कटकारस्थान असल्याचा आरोप करीत त्यांनी तांबे पिता-पुत्रांमध्ये उमेदवारीवरून कौटुंबिक संघर्ष निर्माण झाल्यावर बोट ठेवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी शहर काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसच्या ‘हात से हात जोडो’ कार्यक्रमाचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष पटोले व ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. नंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ एका हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. यावेळी पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसमधून सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध झाल्याचा आरोपही त्यांनी खोडून काढला. पक्षाने दोन कोरे एबी अर्ज पाठवले होते. परंतु, तांबे यांनी ते कचऱ्याच्या पेटीत टाकले. त्याचे उत्तर संंबंधितांकडून दिले जात नाही. आपण बोललो तर अडचण होईल, असे सूचक विधान नाना पटोले यांनी केले.

हेही वाचा – “उमेदवारीवरून राजकारण परिवाराला अडचणीत आणण्यासाठीच”, सत्यजीत तांबे यांचा आरोप; म्हणाले, “काँग्रेसकडे उमेदवारी..”

नाशिकमध्ये आपण कोणाची मनधरणी करायला आलेलो नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शुभांगी पाटील यांना निवडून आणणे प्रत्येकाचे दायित्व आहे. कुणाला व्यक्ती विशेषत्वाने काम करून पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करायचे असेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. देशात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाला नाशिक मतदारसंघात उमेदवार देता आला नाही. दुसऱ्याचे घर फोडण्याचे कटकारस्थान रचून ते आनंद व्यक्त करीत आहेत. त्यांच्या पापाचा घडा जनता लवकरच फोडेल, असे पटोले म्हणाले.

राज्यातील सरकार महाराष्ट्रातातील सर्व काही गुजरातला वाटत आहे. वन्यप्राणी तिकडे नेले जात आहे. महाराष्ट्राला लुटा आणि गुजरातला वाटा, असे त्यांचे धोरण असल्याची टीका पटोले यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य म्हणजे मूळ प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न असल्याचा टोला लगावला. उपमुख्यमंत्री हे बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महागाईवर बोलले नाहीत. ते केवळ स्वत:विषयी बोलत होते. सत्ताधीशांनी जनतेची काळजी करावी, अशी अपेक्षा असते असे पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा – नाशिक : प्रशांत दामले यांना ‘दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट’चा अक्षय्य पुरस्कार

उमेदवारीवरून तांबे कुटुंबातच वाद

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दोन कोरे एबी अर्ज पाठवले होते. ऐनवेळी अशी धोकेबाजी होईल, याची कल्पना नव्हती. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध केला नव्हता. तसे असते तर कोरे अर्ज पाठवले नसते. आम्ही प्रामाणिक असल्याने उमेदवारीला विरोध केल्याचे अप्रमाणिक लोकांनी आरोप करू नये. मुळात उमेदवारीवरून तांबे कुटुंबीयात संघर्ष होता. त्यांच्या कौटुंबिक वादात काँग्रेसला आणू नका, असे आवाहन पटोले यांनी केले. तांबे कुटुंब हे आपल्यापुरते की पक्षापुरते हे स्पष्ट करायला लावू नका. पक्ष कुणाच्या घरचा नसतो. तो कार्यकर्त्यांचा असतो, असेही त्यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole commment on bjp over nashik teacher constituency candidate at inauguration of congress program in nashik ssb