नाशिक : विधानसभा निवडणुकीत वडील नरहरी झिरवळ यांना आव्हान देत उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे (शरद पवार) उंबरठे झिजवणाऱ्या गोकुळ झिरवळ यांचे जिल्हा परिषदेत पुनर्वसन करण्याची तयारी वडिलांकडून होणे स्वाभाविक मानले जाते. मुलाने वडिलांविरोधात उमेदवारी मागणे शरद पवार गटाला शंकास्पद वाटले होते. झिरवळ पिता-पुत्राची काही वेगळी खेळी असल्याची साशंकता व्यक्त झाली होती.
तिकीट नाकारल्याानंतर शरद पवार गटाकडे पाठ फिरवणाऱ्या गोकुळला अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ हे जिल्हा परिषदेत महत्वाचे पद मिळवून देण्यासाठी कंबर कसतील. विधानसभेआधी परस्परांविरोधात भूमिका घेणारे झिरवळ पिता-पुत्र जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र एकत्र आल्याचे पहायला मिळणार आहे.
जवळपास साडे तीन वर्षांनंतर जिल्हा परिषद निवडणुकीला मुहूर्त लाभत आहे. गट, गण आरक्षण सोडतीनंतर रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी मोर्चे बांधणीला वेग दिला. ग्रामीण भागात आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून (अजित पवार) जिल्हा परिषद निवडणूक प्रतिष्ठेची केली जाणार आहे. जिल्ह्यातील १५ पैकी जवळपास निम्म्या म्हणजे सात विधानसभा मतदारसंघात या पक्षाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यातील सर्व गट एसटीसाठी राखीव झाल्यामुळे अनेक इच्छुकांची अडचण झाली असली तरी मंत्री झिरवळ यांचे पुत्र गोकूळ यांना जिल्हा परिषदेत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.
मुलाला राजकारणात पुढे नेण्यासाठी मंत्री झिरवळांकडून त्याचा पुरेपूर लाभ घेतला जाईल. विधानसभा निवडणुकीवेळी झिरवळ पिता-पुत्रांमध्ये बिनसल्याचे चित्र रंगवले गेले होते. वडिलांविरोधात मुलाने शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती.
त्या काळात गोकुळ झिरवळ हे शरद पवार गटाचे मेळावे, बैठकांना अधुनमधून हजेरी लावत होते. वडील नरहरी झिरवळ यांनी शरद पवार गटाकडे परत यावे, अशी इच्छा ते प्रदर्शित करीत होते. दिंडोरीतून विधानसभेची उमेदवारी त्यांनी मागितली होती. परंतु, शरद पवार गटाने त्यांची डाळ शिजू दिली नाही. त्यांना उमेदवारी नाकारली.
तेव्हापासून गोकुळ हे कधीही शरद पवार गटाकडे फिरकले नाहीत. त्यावेळी मंत्री झिरवळ हे आपण शेवटपर्यंत अजित पवार यांच्याबरोबर राहणार. तुम्ही गोकुळची चिंता करू नका. मी त्याचा बाप आहे, तो माझा बाप नाही. तो माझ्या शब्दापुढे जाणार नाही. मी त्याची समजूत काढायचा प्रयत्न करेन” असे सांगत. विधानसभेपूर्वी पिता-पुत्रांचे हे राजकीय द्वंद अल्पावधीत मिटले. नरहरी झिरवळ निवडून येताच आणि मंत्री बनल्यावर या वादाची साधी चर्चा देखील नसते. आता वडीलच मुलास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात स्थिरस्थावर करण्याच्या प्रयत्नात आहेत. दिंडोरी तालुक्यातील सर्व गट एसटीसाठी राखीव असल्याने पित्रा-पुत्रांसाठी संपूर्ण मैदान खुले झाल्याचे चित्र आहे.