नाशिक :शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्याकडे अध्यक्ष होण्यासही आता कोणी तयार नाही. ठाकरे गटाचे सध्याचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांना प्रवेश देण्यात येणार नाही. नाशिक भाजप आता ’हाऊसफुल्ल‘ झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केले.

ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले माजी उपनेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी समर्थकांसह मंत्री महाजन याच्या उपस्थितीत रविवारी येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. महिनाभरापूर्वी बागूल आणि राजवाडे यांच्याविरोधात मारहाण आणि चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्यानंतर तक्रारदाराने भूमिका बदलली. ते भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचे तक्रारदाराने म्हटले होते. या गुन्ह्यात फरार असताना उभयंतांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेशाचा प्रयत्न होता. तथापि, ठाकरे गटाच्या आरोपांमुळे लांबणीवर पडलेला हा प्रवेश अखेर रविवारी झाला.

यावेळी महाजन यांनी खा. संजय राऊत यांना नामोल्लेख न करता त्यांच्यावर टिकास्त्र सोडले. त्यांच्या पक्षाची बिकट अवस्था असून कोणी अध्यक्ष होण्यास तयार नाही, असा टोला त्यांनी हाणला. ठाकरे गटातून सुधाकर बडगुजर, नंतर मामा राजवाडे भाजपमध्ये आले. आता ठाकरे गटाने प्रथमेश गिते यांना महानगरप्रमुख केले. त्यांना मात्र प्रवेश दिला जाणार नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

सुनील बागूल यांचा हा शेवटचा प्रवेश असून आता त्यांनी इकडेतिकडे जाऊ नये, असे त्यांनी सूचित केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र रहायला हवे. महापालिका निवडणुकीत राज्यात नाशिकमधून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा विक्रम करायचा आहे. गतवेळी भाजपच्या ६७ जागा होत्या. यावेळी १२२ पैकी १०० चा आकडा पार करायचा असल्याचे त्यांनी नमूद केले.