नाशिक : प्रशासनाकडून गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येत असताना मिरवणुकीतील क्रमांकावरुन काही मंडळांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर या वादातून तोडगा काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

शहरातील विसर्जन मिरवणूक यंदाही पारंपरिक मार्गाने आणि नेहमीच्या पध्दतीनुसारच निघणार आहे. मानाचे म्हणून काही गणेश मंडळांना मिरवणुकीत प्रारंभी स्थान दिले जाते. दरवर्षीच्या या पध्दतीत बदल करण्याची मागणी काही मंडळांनी पोलीस प्रशासनाबरोबर आयोजित बैठकीत केली. मागणी मान्य होणार नसल्याचे दिसताच काहींनी बैठकीतून बाहेर पडण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या मध्यस्थीने बैठक पुन्हा सुरू झाली.

पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी मंडळ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू होईल, असे सांगितले. प्रत्येक मंडळाचे एकच ढोल पथक असेल, संख्या ७० इतकी असेल, पाच वाहनांची मर्यादा मंडळांना राहील, प्रत्येक मंडळांचे स्वयंसेवक असावेत, त्यांना विशिष्ट गणवेश असावा, मिरवणुकीत १२ थांबे असतील. प्रत्येक चौकात २० मिनिटे मंडळांना प्रात्यक्षिक सादर करण्यास वेळ मिळणार आहे. कोणी पुढे जाण्यास विलंब केल्यास त्यांना पुढच्या वर्षी मागचा नंबर दिला जाईल, असा इशारा देण्यात आला. गणेश मूकबधिर मित्र मंडळाला सात नंबर देण्यास पोलीस आयुक्तांनी सांगितले. फक्त या वर्षी त्यांना हेच स्थान दिले गेले असल्याचे सांगितल्यावर काहींनी मिरवणुकीतील क्रमवारीवर नाराजी व्यक्त केली. यावर पोलिसांनी मिरवणुकीचे क्रमांक काढण्यापलीकडे बंदोबस्ताचे काम असल्याचे सुनावले.

दरम्यान, सायंकाळी उशीरापर्यंत मिरवणुकीतील पहिली पाच गणेश मंडळे रात्री ११ पर्यंत वेळ लावत असल्याने अन्य मंडळांना रात्री १२ नंतर वादन न करता बाहेर पडावे लागते, अशी तक्रार करण्यात आली. त्यामुळे मंडळांची क्रमवारी बदलावी, सोडचिठ्ठी पध्दतीने मतदान घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. नंबरची पध्दत बाद करण्यात यावी. मूकबधीर गणेश मंडळ, चांदीचा गणपती, गुलालवाडी व्यायामशाळा, नाशिक महानगरपालिका या मंडळाना प्रारंभीचे स्थान द्यावे, असे सूचविण्यात आले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याबरोबर यासंदर्भात बैठक घेतली. मात्र मतदान झाले नाही. यामुळे मिरवणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा नवक्रांती मंडळाचे कैलास पंडित देशमुख यांनी दिला. नाराज मंडळांमध्ये नवक्रांती मंडळ , बुरूड गल्ली मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ , शनैश्वर मित्र मंडळ, भोई गल्ली मित्र मंडळ, महालक्ष्मी सोशल फाऊंडेशन, गर्जना युवा प्रतिष्ठान या मंडळांचा समावेश आहे.