जळगाव : नाशिकचे पालकमंत्रीपद जाहीर होऊनही निव्वळ शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) विरोधामुळे गिरीश महाजन यांना ते सोडावे लागले. तेव्हापासून पालकमंत्रीपदाचा तिढा तसाच कायम असताना, शिंदे गटाचे नेते मंत्री दादा भुसे आणि भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यात आता पुन्हा राजकीय कलगी तुरा रंगला आहे.
कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदास महत्व प्राप्त झाले असताना महायुतीतील तीनही पक्षांनी पालकमंत्रीपदाचा विषय प्रतिष्ठेचा केला. त्यासाठी भाजपकडून गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ॲड. माणिक कोकाटे, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री दादा भुसे ही मंडळी इच्छुक होती. बरीच ओढाताण होऊनही अखेर तोडगा निघाला नाही.
महायुतीतील मतभेद कायम असताना आता पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेतील चार मंत्र्यांना कुंभमेळा मंत्री समितीत स्थान देऊन खूश केले आहे. अर्थात, या समितीचे प्रमुख कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हेच आहेत. पालकमंत्रीपदाच्या तिढ्यात प्राधिकरणाचे कामकाज या समितीच्या सल्ल्याने करण्याचा तोडगा काढला गेल्याचे मानले जात असले, तरी पालकमंत्रीपदाची इच्छा मंत्री महाजन यांच्यासह दादा भुसे व अन्य दिग्गज अजुनही बाळगून आहेत.
देशाचे गृहमंत्री अमित शाह हे रविवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी अमित शाह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत काही तोडगा निघाला का? असा सवाल मंत्री दादा भुसे यांना विचारण्यात आला होता. मात्र, नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल, असं मिश्किल वक्तव्य दादा भुसे यांनी केलं. ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
दरम्यान, दादा भुसे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील टीका केली. डोनाल्ड ट्रम्प आधी तुम्हाला दारात उभा करतात का ते बघा. सध्या ट्रम्प हे आपल्या देशाशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ज्या पद्धतीने वागत आहेत, आपल्या देशावरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत, ते पाहता डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला जवळ तरी उभा करतात का ते पाहा, अशा शब्दांत ठाकरे गटाने भुसे यांना लक्ष्य केले.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये खान्देश शिक्षण मंडळातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनीही दादा भुसे यांना डोनाल्ड ट्रम्प प्रकरणावरून डिवचण्याचा प्रयत्न केला. भुसे यांच्या म्हणण्यानुसार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे घनिष्ठ संबंध कदाचित असतील. त्यामुळे ते ट्रम्प यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सोडविण्याची विनंती करतील. किंवा फोन करून सांगतील की काही तरी करा म्हणून.माझे तसे कोणतेच संबंध अमेरिकेशी नाहीत किंवा मी तिकडे गेलोही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील माझी नाशिकचे पालकमंत्रीपद तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी चर्चा झालेली नाही, असे मिश्किल उत्तर महाजन यांनी दिले.