नाशिक – लोकसहभागातून आगामी कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने प्रथमच कुंभ मंथन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. अपवाद होता, तो केवळ कुंभमेळा मंत्री समितीतील सहा मंत्र्यांचा. स्थानिक मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, माणिक कोकाटे हे देखील या कार्यक्रमात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

कुंभमेळा प्राधिकरणतर्फे रविवारी पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहात कुंभ मंथनचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपचे आ. राहुल ढिकले, आ. मंगेश चव्हाण, प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनिषा खत्री आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात क्रेडाई, निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर, आयएमए, लघू उद्योग भारती, वाहतूकदार आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध सूचना मांडल्या. त्यास मंत्री महाजन यांनी प्रतिसाद दिला. सिंहस्थ कुंभमेळा हा सर्वांचा आहे. तो स्वच्छ, सुरक्षित, हरित आणि यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. कुंभ मंथनातून प्राप्त सूचनांचा नियोजनात अंतर्भाव करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील मतभेद कायम असताना मित्रपक्षांना कुंभमेळ्याच्या कामात सहभागी करण्यासाठी सरकारने नुकतीच कुंभमेळा मंत्री समिती स्थापन केली. कुंभमेळा मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली समितीत राष्ट्रवादीचे (अजित पवार) छगन भुजबळ आणि ॲड. माणिक कोकाटे, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) दादा भुसे आणि उदय सामंत, भाजपचे जयकुमार रावल आणि शिवेद्रसिंह भोसले यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

कुंभ मंथन कार्यक्रमात मंत्री समितीचे अध्यक्ष वगळता उर्वरित कुणीही उपस्थित नव्हते. यातील भुजबळ, भुसे आणि कोकाटे हे स्थानिक मंत्री आहेत. रविवारी भुजबळ आणि भुसे हे दोन्ही मंत्री नाशिकमध्ये होते. प्रशासकीय यंत्रणेने मंत्री समितीतील सदस्यांना निमंत्रित केले की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुंभमेळ्यावर आपला प्रभाव राखण्यासाठी महायुतीतील तीनही पक्ष प्रयत्नशील आहेत. या स्थितीत महत्वाच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांना वगळल्याचे उघड झाले.