नाशिक – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांतून मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीासांनी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत झालेल्या कारवाईत पंजाब राज्यातील विदेशी मद्यसाठ्याची राज्यात प्रतिबंधित अवैध दारू मुंबई आग्रा महामार्गावर जप्त करण्यात आली. या कारवाईत अकरा लाख किंमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखा काम करत आहे. मुंबई आग्रा महामार्गाने धुळे ते नाशिक बाजुकडे येणाऱ्या एका मालवाहतुक वाहनामधून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मद्याची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मुंबई आग्रा महामार्गावर पाचोरे वणी शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास वाहन तपासणी सापळा लावला.

राज्यात विक्रीस प्रतिबंधित तसेच पंजाब राज्य निर्मित व केवळ पंजाब राज्यात विक्री करता असलेला मुद्देमाल ताब्यात घेतला. या मध्ये पंजाब राज्य निर्मित नाईन वन व्हिसकीचे १२३ बॉक्स किं. अकरा लाख सात हजार ८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एकोणावीस लाख सात हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मध्ये आशिष फिरोदिया ५४ रा. आनंदवल्ली याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेते पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार विनोद टिळे आदींनीही कारवाई केली.

आरोपी आशिष हा त्याच्या मालकीच्या वाहनामध्ये पंजाब राज्यातील मद्यसाठा घेवून मागील बाजुस फळांचे रिकामे क’रेट ठेवुन गाडीच्या मागील बंद भागात एक छुपा कप्पा तयार करून त्यात हा अवैध मद्यसाठा ठेवण्यात आला होता. संशयिताला पोलीसांनी अटक केली असून हा अवैध तसेच प्रतिबंधित मद्यसाठी काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करण्याचा उद्देशाने ही तस्करी करत असल्याचे समोर आले. आशिष हा मद्य तस्करी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी नाशिक शहर तसेच ग्रामीण हद्दीत विविध पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा व दारूबंदी कायद्यान्वये सात गुन्हे दाखल करण्यात आले.