नाशिक – अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनात नवनिर्वाचित अध्यक्ष महंत मोहनराज कारंजेकर बाबा यांनी मराठी भाषेचे विद्यापीठ आणि महानुभाव पंथीयांच्या अनेक मागण्या मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे काही काळ नांदेडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती.
तेव्हा त्यांनी तीर्थक्षेत्रांना उपलब्ध केलेल्या निधीचा उल्लेख करीत कृतज्ञता व्यक्त केली. या नेत्यांसमोर महंत कारंजेकर बाबा हे उपस्थित नसलेल्या, मध्यंतरी भाजपमधून मनसेत गेलेल्या नेत्याचा गौरव करण्यास विसरले नाहीत. आजवर त्या नेत्याने यशस्वी केलेल्या कार्यक्रमांची यादी मांडत महंतांनी महायुतीच्या नेत्यांना एकप्रकारे आश्चर्याचा धक्का दिला.
पंचवटीतील जयशंकर लॉन्स येथे आयोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनास शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादा भुसे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी खासदार भास्कर भगरे, दिलीप बनकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे या आमदारांसह माजी आमदार बाळासाहेब सानप उपस्थित होते.
परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहनराज कारंजेकर बाबा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्यामुळे महानुभाव परिषदेचे विविध उपक्रम मार्गी लागल्याची भावना व्यक्त केली. राज्य शासनाच्या माध्यमातून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ साकारत आहे. तेथे प्रवेश प्रक्रिया होऊन अभ्यासक्रम सुरू झाले.
शासनाने महानुभाव पंथाच्या विविध स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याचे त्यांनी नमूद केले. गिरीश महाजन हे नांदेडचे पालकमंत्री असताना त्यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. महाजन यांच्याकडे पर्यटन व ग्रामविकास ही खाती असायला हवीत, असा आग्रह धरला. महानुभाव परिषदेच्या अधिवेशनास उपस्थित राहिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
महानुभाव संप्रदायातील मंडळी अनेक पक्षात आहेत. आज या ठिकाणी दिनकरअण्णा पाटील उपस्थित नसले तरी मनसे, दिलसे ते नक्कीच येथे आहेत, असे महंत कारंजेकर बाबा यांनी सांगितले. अन्य पक्षातील लोकांचे काम असते, तेव्हा आपण मुख्यमंत्र्यांकडे जातो. ते पक्ष न बघता काम करतात. नाशिकमध्ये दत्ता गायकवाड, दिनकर पाटील, आप्पा भोजने अशी मंडळी अतिशय तडफेने काम करतात. त्यांनी ताकद लावल्याने डोंगरे मैदानावरील महानुभाव संमेलनात एक लाख लोक जमले होते.
दिनकर पाटील यांनी नंतर गुजरातमध्ये कार्यक्रम यशस्वी केला. महाकवी कालिदास कला मंदिरातील कार्यक्रमात सभागृह अपुरे पडले होते, असे दाखले देत महंत कारंजेकर बाबा यांनी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्याने नाराज दिनकर पाटील हे मनसेत गेले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पाटील यांच्याकडून भाजपसह कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले जाते. या परिस्थितीत महानुभाव अधिवेशनात पाटील यांचे कौतुक झाल्याने भाजपची नेतेमंडळी बुचकळ्यात पडली.
