मनमाड – आठवड्यातून सहा दिवस मुंबई-नाशिक-नागपूर दरम्यान धावणारी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या गाडीमुळे सध्याच्या शिर्डी-मुंबई बरोबरच आणखी एक अत्याधुनिक वेगवान, आरामदायी व सुखद प्रवासाचा अनुभव देणारी रेल्वे नाशिककरांना मिळणार आहे. नव्या वंदे भारतमुळे नाशिक, मुंबई प्रवासात एक तासाची बचत होणार आहे. या गाडीचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
नागपूरहून सुटल्यानंतर वर्धा, अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि दादर असे थांबे या गाडीला देण्यात येणार असून मनमाडलाही थांबा देण्यात यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. ही नवी वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई, नाशिक आणि भुसावळ या मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. नुकतीच रेल्वे प्रशासनाकडून या मार्गाची चाचणी यशस्वीपणे पार पडली. मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली खासदारांची बैठक घेण्यात आली. त्यात ही रेल्वेसेवा सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून एकूण ११ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. त्यात (मुंबई-नागपूर मार्गावरील) या दोन गाड्या समाविष्ट झाल्यावर एकूण संख्या १३ वर पोहोचेल.
मनमाडला थांबा देण्याची मागणी
उत्तर महाराष्ट्रातून धुळे, मालेगाव, मनमाड, नांदगाव, चांदवड, लासलगाव, येवला येथून दररोज मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच मनमाडचे गुरूद्वारा आणि शिर्डी देवस्थानचे आंतरराष्ट्रीय महत्व लक्षात घेता मनमाड रेल्वे स्थानकात या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा देण्यात यावा, यासाठी लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.