नाशिक – सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली येथील हत्येच्या गुन्ह्यातील सहा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखा एकच्या पथकाने नाशिकमध्ये ताब्यात घेतले. शहर परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याने या घटनांच्या अनुषंगाने पाहिजे असलेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकच्या तपासी पथकाकडून गस्त घातली जात असतांना डोंगरे वसतिगृह मैदानासमोर एक चारचाकी वाहन संशयास्पदरित्या फिरत असतांना दिसून आली. पोलिसांनी वाहन थांबवत विचारणा केली. संशयितांनी आनंद सेठ (२७), संतोष जाधव (३६), मितेश हलपती (३२) सर्व रा. सिल्वासा आणि प्रेम रामपूरकर (२१), कौशल आचार्या (३४), मोटुकुमार पासवान (३५) तिघेही राहणार दादरा नगर हवेली अशी त्यांची नावे सांगितली.
२६ जून २०२४ रोजी कुणाल उर्फ जानकीनाथ प्रसादने आनंद याच्यावर गोळ्या झाडत त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्यातून आनंद वाचला. मात्र आनंद याला पुन्हा मारण्याचा प्रयत्न झाला. या रागातून आनंदने कुणालची हत्या केल्याची कबुली दिली.