नाशिक – नाशिक शहर पोलीस गुन्हेगारांविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना वेगवेगळ्या गुन्ह्यांत फरार असणार्यांना पकडण्याचे सत्र सुरू आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात फरार सराईत गुन्हेगाराला पोलीसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडले. पोलीसांना पाहताच संशयित दुचाकीवर पळून जात होता. पोलीस रस्त्यावर त्याच्या मागे धावले. त्याला रोखून ताब्यात घेतले. पाठलागाची चित्रफित नाशिक पोलीसांच्या कर्तबगारीचे दर्शन घडवत आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी, अंमली पदार्थांची विक्री यावरून विरोधी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यापुढील काळात अनेक घडामोडी घडल्या. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री दादा भुसे यांनी बैठक घेत गुन्हेगारीला लगाम घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांनी दक्ष रहावे, अशी सूचना केली होती.
या बैठकीच्या दुसर्याच दिवशी भाजपच्या सीमा हिरे, देवयानी फरांदे व राहुल ढिकले या तीनही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन वाढत्या गुन्हेगारीचा विषय मांडला होता. याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले.
तेव्हापासून पोलीसांकडून गुन्हेगारांविरोधात धडक कारवाईचे सत्र सुरू आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांशी संबंधित राजकीय पदाधिकारी, माजी नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली. टवाळखोर, अंमली पदार्थ विक्रेते, अवैध धंदे चालक आदींसह विविध गुन्ह्यांत फरार असणार्या संशयितांचा शोध सुरू आहे. त्या अंतर्गत दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला पंचवटीतील क्रांतीनगर भागात पाठलाग करून पकडण्यात आले.
संशयित किरण भडांगे असे या संशयीताचे नाव आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तो फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते. संशयित क्रांतीनगर भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकातील अंमलदार रिक्षाने त्या भागात पोहोचले. संशयित भडांगेला पोलीसांची चाहूल लागताच तो दुचाकीवरून पळून जाऊ लागला. हे पाहून पोलीस क्षणार्धात रिक्षातून उतरले. रस्त्यावर धावत त्याचा पाठलाग सुरू केला. पोलीस कर्मचारी दुचाकीसोबत धावले.
दुचाकीचे हँडल त्यांनी सोडले नाही. संशयीताने चौकातील रस्ता ओलांडला. काही वेळात पोलिसांनी दुचाकी रोखण्यास भाग पाडून त्याला ताब्यात घेतले. या घटनाक्रमाची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिली. संशयित किरण भडांगे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी दरोडा, लूटमारीचे गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगीतले. संशयीतास पकडण्यासाठी पोलीसांनी कसा पाठलाग केला ते सभोवतालच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे.