नाशिक – देशात नाशिक आणि जुन्नर (जि. पुणे) हे बिबट्यांचे केंद्र आहेत. जिल्ह्यात नाशिक, सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला हा बिबट्यांचा मार्ग आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नाशिक आणि निफाड येथे कायमस्वरुपी चार बचक पथके तैनात करण्यात आली आहेत. वडनेर दुमाला आणि आर्टिलरी सेंटर भागातील बिबट्यांच्या संशोधनासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या त्रयस्थ संस्थाच्या सहकार्याने संशोधन करुन त्यानुसार उपाययोजना राबविण्यात येतील, अशी माहिती वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली.
नाशिक वनविभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहनिमित्त मानव-बिबट सहजीवन विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्रावेळी उपवनसंरक्षक (वन्यजीव विभाग) कृष्णा भवर, उपवनसंरक्षक सिध्देश सावर्डेकर (पश्चिम भाग), राकेश सपट (पूर्व भाग), विभागीय वनअधिकारी गणेश रणदिवे, विभागीय व्यवस्थापक (वनविकास महामंडळ) सुजित नेवसे, सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार, शिवाजी सहाणे, शेखर देवकर, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद भणगे यांच्यासह इतर उपस्थित होते. यावेळी जी. मल्लिकार्जुन यांनी, बिबट्यांचे हल्ले कमी करण्यासाठी वनविभाग जनजागृतीवर भर देत असल्याचे सांगितले.
नाशिक शहराभोवती बिबट्यांची वाढती संख्या, मानवावर वाढलेले हल्ले तसेच बिबट्यांच्या पुनर्वसनाबाबत संशोधन करण्यात येणार आहे. केंद्र शासनाला त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नाशिकमध्ये बिबट्यांसाठी कायमस्वरुपी बचाव केंद्र कार्यन्वित करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे मल्लिकार्जुन यांनी सांगितले.अन्य शासकीय यंत्रणा आणि जनतेने पुढे येऊन आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मिलिंद भणगे, निकित सुर्वे, दीप्ती हमरस्कार, अभिजीत महाले आदींनी मानव-बिबट सहजीवनासंदर्भातील निरनिराळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.
वनविभागाचे काम
वनविभागाच्या वतीने राज्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २७३ बिबट्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वनविभागाच्या बचाव पथकातील किरण रहाळकर यांनी सांगितले, चार वर्षात नाशिक आणि पुणे जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. पाच वर्षात ८६ बिबट्यांचे बछडे आणि आई यांची पुनर्भेट घडवून आणल्याची माहिती दिली. पाच ते सहा टक्के बिबट्यांचा मृत्यु हा रस्ते अपघातात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक मध्ये वाढणारे बिबट्याचे हल्ले
नाशिक सह सिन्नर भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. यातील काही भागा मध्ये मका, ऊस याची शेती असल्याने बिबट्याला लपण्यास जागा आहे. याशिवाय बिबट्याचा वावर असलेला भागात झाडी, झुडपी दाट आहे. मानवी वस्ती विखुरली आहे. याचा फायदा बिबट्याला होत आहे. नाशिक मध्ये वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, जयभवानी रोड सह अन्य भागात बिबट्या दिसला. सिन्नर मधील ग्रामीण भागात बिबट्या फिरत असून पशुधनासह मानवावर हल्ले करत आहे.