नाशिक : नाशिक शहरात नंदिनी नदीकाठी तीन गोण्यांमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्याच्या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोच मंगळवारी इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीत सारूळे शिवारात जिलेटीनचा साठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी जप्त केला.

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन आणि गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध होण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्यात येत आहे. वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीत सारूळ गाव शिवारात अवैधरित्या जिलेटीनचा साठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

नाशिक ग्रामीणचे श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकासह पोलिसांनी सारूळ गाव शिवारात छापा टाकला. घराच्या पाठीमागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये अमोनियम नायट्रेटयुक्त असलेल्या जिलेटीनसारख्या स्फोटक पदार्थाच्या कांड्या भरलेले खोके आणि डेटोनेटर एकत्रितपणे निष्काळजीपणे मिळून आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोरख ढगे (३४), विकास नवले, ओंकार नवले (२३), गौरव नवले (३२) आणि कोठावदे सर्व रा. सारुळ यांना तसेच दीपक क्षीरसागर (३२, रा. शिंगवे बहुला), अमित अजमेरा यांना ताब्यात घेण्यात आले.

यातील काही संशयितांकडे जिलेटीनसारख्या स्फोटक पदार्थांच्या कांड्या भरलेल्या खोक्यांच्या संपर्कात डेटोनेटर ठेवण्याचा कोणताही अधिकृत परवाना नाही. हे माहिती असतांनाही त्यांनी निष्काळजीपणे तो साठा केला. यातील संशयित अमित अजमेरा आणि कोठावदे यांनी काम झाल्यानंतर स्फोटके हे सुरक्षितरित्या बंदिस्त करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी हे काम निष्काळजीपणे केले. या प्रकरणी आठही जणांवर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशोत्सवानिमित्त ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असताना भाभानगर येथील गायकवाड सभागृह परिसरात नंदिनी नदीकिनारी रविवारी दुपारी तीन गोणी आढळून आल्या. या गोणींमध्ये संशयास्पद कांड्या असल्याने स्थानिकांनी मुंबईनाका पोलिसांशी संपर्क साधला. वरिष्ठ निरीक्षक संतोष नरूटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. गोणींमध्ये स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीनच्या कांड्या असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाला बोलावले.

या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांना काम करतांना गर्दीलाही आवरावे लागले. गोण्यांची श्वान आणि बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी करण्यात आली असता प्रथमदर्शनी व्यावसायीक कामासाठी जिलेटीन कांड्यांचा वापर करण्यात आल्याचे तपासणीत उघड झाले. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली.